सरकारचे डोके ठिकाणावर येत नाही, तोपर्यंत मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही…

राज्य सरकारचे वित्त खाते जबाबदार असून या दोन खात्यांत नसलेला समन्वय कारणीभूत आहे, असा आरोप भातखलकर यांनी केला. या फसवणुकीविरोधात सरकारला जाब विचारला जाईल. अजूनही सरकारने सवलत न दिल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल.
Atul Bhatkhalkar
Atul Bhatkhalkar

मुंबई : वीजबिल माफीसाठी अनेकदा आंदोलने करूनही सरकारचे डोके ठिकाणावर येत नाही. लातो के भूत बातों से नही मानते, असा हा प्रकार आहे. मात्र वीजबिलात सवलत मिळत नाही, तोपर्यंत राज्य सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखलकर यांनी आज येथे दिला.

वीजबिलात सवलत मिळावी, या मागणीसाठी भाजपतर्फे आज मुंबईत अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. भातखलकर यांच्या नेतृत्वाखाली आकुर्डी येथील तलाठी कार्यालयावर मुख्य आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मोर्चासमोर बोलताना भातखलकर यांनी हा इशारा दिला. लॉकडाउन काळात आलेल्या वाढीव वीजबिलांपैकी निदान लहान वीज ग्राहकांना तरी सवलत दिली जाईल, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी आधी दिले होते. मात्र नंतर त्यांनी हे आश्वासन फिरवले, त्याला राज्य सरकारचे वित्त खाते जबाबदार असून या दोन खात्यांत नसलेला समन्वय कारणीभूत आहे, असा आरोप भातखलकर यांनी केला. या फसवणुकीविरोधात सरकारला जाब विचारला जाईल. अजूनही सरकारने सवलत न दिल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असाही इशारा त्यांनी दिला.

जनतेला वीज बिलातून सवलत देण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात तरतूद करावी आणि वीज माफी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी पक्षाचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर,  विनोद शेलार, अप्पा बेलवलकर, सुनीता यादव, सुरेखा पाटील, संगीता शर्मा हे पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक तसेच शेकडो नागरिक उपस्थित होते.

भातखलकर यांना अटक, कार्यकर्ते संतापले... 
पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, तसेच भातखलकर यांना ताब्यात घेऊन समतानगर पोलिस ठाण्यात नेले. त्यामुळे संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला आणि पोलिस ठाण्यालाही काही काळ घेराव घातला.
 
मागठाणे येथेही आंदोलन
मागठाणे विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक प्रकाश दरेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी आंदोलन केले. सरकारने जनतेची फसवणूक थांबवली नाही तर यापुढेही तीव्र आंदोलने केली जातील, असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला.

योगेश सागर यांनी केली होळी 
चारकोप येथील भाजप आमदार योगेश सागर यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी वीज बिलांची होळी केली. सरकारने केलेल्या या फसवणूकप्रकरणी जनता सरकारला धडा शिकवेल, असा इशाराही सागर यांनी दिला. यावेळी नगरसेविका लीना देहरकर तसेच अन्य पदाधिकारी हजर होते.

धारावी येथे निदर्शने 
धारावी सायन विभागातही आमदार तमिल सेलवन यांच्या नेतृत्वाखाली वाढीव वीजबिलांविरोधात निदर्शने करण्यात आली.

गोरेगावातही आंदोलन
गोरेगावातही पक्षातर्फे वाढीव बिलांविरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी तसेच नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक हजर होते.

मनसेतर्फे आंदोलन 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज मुंबईत विविध ठिकाणी मोर्चे, आंदोलने, वीज बिलांची होळी तसेच वीजबिल सवलतीच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम अशा विविध प्रकारे निषेध नोंदविण्यात आला.

काँग्रेसचे आंदोलन
वीज बिलात सवलत मिळावी या मागणीसाठी भांडूप काँग्रेसतर्फेही महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश कोपरकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात  
आला

(Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com