...तर शाळा संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करू : बच्चू कडू - then let us file criminal cases against school directors said bachchu kadu | Politics Marathi News - Sarkarnama

...तर शाळा संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करू : बच्चू कडू

मंगेश गोमासे
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

सीबीएसई शाळांमध्ये शाळेतूनच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती केल्या जाते. हाच प्रकार बोर्डाच्या काही खासगी इंग्रजी शाळाही करतात. त्यावर बच्चू कडू यांनी सीबीएसई शाळांना यापुढे याद राखा, असे सांगून चांगलेच ठणकावले.

नागपूर : सीबीएसई शाळांकडून पालकांना एसएमएस आणि फोन कॉल करुन वाढीव शैक्षणिक शुल्क आणि शाळेतुनच साहित्य खरेदीसाठी त्रस्त केले जात आहे. याविरोधात पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदने दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलनही केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. काल शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बचत भवनात बैठक घेऊन पालकांवर सक्ती केल्यास संचालक आणि मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हे दाखल करू, असा दम भरला. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शाळा संचालकांचे धाबे दणाणले आहे. 

पालकांच्या तक्रारींवरून सीबीएसई शाळांतील पालक आणि मुख्याध्यापकांची बैठक मंत्री कडू यांनी शुक्रवारी बचतभवन येथे घेतली. पालकांच्या तक्रारीवर थेट मुख्याध्यापकांना उत्तर देण्यास त्यांनी आदेश दिले. त्यामुळे अनेक मुख्याध्यापक घाबरले होते. ज्या शाळांनी पालकांकडून अतिरिक्त शुल्क घेतले, एक महिन्यात त्या शुल्काची वसुली करण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले. तसेच याकरिता प्रत्येक शाळेतून दोन पालक आणि संघटनांचे प्रतिनिधी यांची समिती तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीला अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, विभागीय उपसंचालक अनिल पारधी, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. शिवलिंग पटवे, प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी व पदाधिकारी उपस्थित होते. 

अधिकारीही अडचणीत 
सीबीएसई शाळांकडून पालकांची होणारी लूट याविरोधात अनेकदा पालक संघटनांनी शिक्षणाधिकारी ते उपसंचालक कार्यालयात निवेदने दिली. विधानसभा अध्यक्षांनीही विभागीय शुल्क नियामक समिती तयार करण्याचे निर्देश दिलेत. मात्र एकाही अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याचे यावेळी पालकांनी सांगितले. 

‘यापुढे याद राखा‘ 
सीबीएसई शाळांमध्ये शाळेतूनच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती केल्या जाते. हाच प्रकार बोर्डाच्या काही खासगी इंग्रजी शाळाही करतात. त्यावर बच्चू कडू यांनी सीबीएसई शाळांना यापुढे याद राखा, असे सांगून चांगलेच ठणकावले.

(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख