मंदिर बंद, उघडले बार; उद्भवा धुंद तुझे सरकार !  - temple closed bar open rise up your government | Politics Marathi News - Sarkarnama

मंदिर बंद, उघडले बार; उद्भवा धुंद तुझे सरकार ! 

अतुल मेहेरे
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

बुद्ध विहारात लोक बुद्धांच्या मूर्तीला नमस्कार करतील. मशिदीमध्ये त्यांच्या धर्माचे लोक नमाज करू शकतील. कोविडचे नियम अजून कडक केले तरी आम्हाला चालतील, पण आता सर्व धार्मिक स्थळे उघडली पाहिजे. शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात मदिरा सुरू होऊ शकते, पण मंदिरे सुरू होऊ शकत नाही, म्हणजे येथे काय मोगलाई लागली आहे का?

नागपूर : कोरोनामुळे केलेले लॉकडाऊन उठवताना टप्प्याटप्प्याने वाईन शॉप आणि वाईन बार उघडण्यात आले. पण राज्यातील जनतेची श्रद्धास्थान असलेली मंदिरे अद्यापही उघडण्यात आलेली नाहीत. त्यामुळे भाविकांना देवाच्या दर्शनापासून मुकावे लागत आहे. नवरात्रोत्सव तीन दिवसांनी सुरू होणार आहे, त्यामुळे आतातरी सरकारने मंदिरे उघडावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने राज्यभर आंदोलने केली. नागपुरात आज वर्धा मार्गावरील साई मंदिरासमोर भाजपचे प्रदेश महासचिव आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. 

मंदिर बंद उघडले बार, उद्भवा धुंद तुझे सरकार !, असे फलक झळकावत आंदोलकांनी भजने गायीली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देशाच्या सर्व राज्यांतील सर्व मंदिरे उघडले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू होऊनही मंदिरे अद्याप उघडण्यात आलेले नाहीत. लोकांचा रोजगार गेलेला आहे, हजारो दुकाने बंद पडलेली आहेत. मंदिरांसमोर असलेल्या दुकानांमधून लाखो कुटुंबांच्या संसाराचा गाडा चालतो. मंदिरे उघडली पाहिजे कारण या विषयात एकीकडे श्रद्धा आहे, तर दुसरीकडे रोजगार आहे. मंदिरे ही लोकांची श्रद्धास्थानं आहेत आणि या श्रद्धास्थानांवर जाण्यापासून मज्जाव करणे योग्य नाही. 

वाईन शॉप आणि बारमध्ये गर्दी होत नाही का? दुकानांसमोर रांगा लागतात. पण तेथे सोशल डिस्टंसिंग पाळून ती दुकाने सुरू केलीच ना? मग तशीच व्यवस्था लावून मंदिरे का सुरू केली जात नाही. जेव्हा डॉक्टर थकतात, हारतात, तेव्हा देवाचाच धावा केला जातो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. या संस्कृतीला छेद देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. आज आमच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने शांततेच्या मार्गाने आम्ही मंदिरे उघडण्याची मागणी करीत आहोत. ही मागणी जर पूर्ण झाली नाही, तर उद्या आम्ही रस्त्यांवर उतरून उग्र आंदोलने करू आणि त्यावेळी जर काही कमीजास्त झाले, तर त्याला सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार राहतील, अशा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. 

मोगलाई सुरू आहे का : प्रवीण दटके
गर्दी आणि रांगा काय फक्त मंदिरांमध्येच लागतात का? देशी दारू दुकानांसमोर सकाळपासून रांगा बघायला मिळतात. वाईन शॉप आणि बारमध्येही रोजच गर्दी असते. बसेसही सुरू केल्या, त्यासुद्धा पूर्ण क्षमतेने. इतर सर्व राज्यांनी सर्व धार्मिक स्थळे सुरू केली. मग महाराष्ट्रातच काय अडचण आहे. सोशल डिस्टंसिंग पाळून मंदिरांमध्ये दर्शनाला परवानगी द्यायला काय हरकत आहे. लोकं दहा फूट अंतरावरून नमस्कार करतील ना त्यांच्या देवांना.

बुद्ध विहारात लोक बुद्धांच्या मूर्तीला नमस्कार करतील. मशिदीमध्ये त्यांच्या धर्माचे लोक नमाज करू शकतील. कोविडचे नियम अजून कडक केले तरी आम्हाला चालतील, पण आता सर्व धार्मिक स्थळे उघडली पाहिजे. शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात मदिरा सुरू होऊ शकते, पण मंदिरे सुरू होऊ शकत नाही, म्हणजे येथे काय मोगलाई लागली आहे का, असा सवाल आमदार प्रवीण दटके यांनी केला. आजच्या आंदोलनात छोटू भोयर, अर्चना डेहनकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.   
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख