असा फसला होता तस्कर राजा गौससाठी जेल तोडण्याचा प्लान !

गुन्हे शाखेच्या एका हवालदाराला जेलमधील खबऱ्याने राजा गौसच्या प्लॅनची माहिती दिली. एक एपीआय आणि हवालदाराने चेतनचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर चेतनकडून गुन्हे शाखेने देशीकट्टा जप्त केला. त्याने जेल ब्रेक करण्याचा कट रचल्याची कबुली दिली.
असा फसला होता तस्कर राजा गौससाठी जेल तोडण्याचा प्लान !

नागपूर : कुख्यात गुंड आणि नुकत्याच अमरावती मार्गावरील बोले पेट्रोल पंपाजवळ झालेल्या बिनेकर हत्याकांडातील मुख्य आरोपी चेतन हजारे याने नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेला सुरूंग लावत जेल तोडण्याचा प्लान बनवला होता. सराफा दुकाने लुटणारा कुख्यात ड्रग तस्कर राजा गौसला तो जेलमधून बाहेर काढणार होता. पण गुन्हे शाखेने तो सक्रिय होण्यापूर्वीच त्याचा डाव उधळला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात चेतन हजारे एका गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात होता. तेथे त्याची कुख्यात दरोडेखोर आणि देशीकट्टा विक्रेता राजा गौस याच्याशी ओळख झाली. राजा गौसने त्याला देशीकट्टे कुठे मिळतात आणि नागपुरात कसे आणायचे याबाबत माहिती दिली. तेव्हापासून चेतन राजा गौसचा फॅन झाला. काही दिवसानंतर राजा गौस याने मध्यवर्ती कारागृहातून पळून जाण्याची योजना आखली. त्यासाठी चेतनला मदत मागितली. त्यावेळी कारागृहातील सुरक्षारक्षकांना सेट करून कैदी मोबाईल बरॅकमध्ये ठेवत होते. राजा गौसने चेतनशी मोबाईलवरून संपर्क करीत कारागृहातून पळून जाण्यासाठी मदत मागितली होती. चेतननेही लगेच होकार दिला. आपल्या पाच साथीदारांना प्लॅनमध्ये सहभागी केले. भरदुपारी मुलाखत कक्षाजवळून जेलब्रेक करण्याचे ठरले. त्यासाठी चेतनच्या टोळीने तयारी केली होती. 

गौसने पुरविले देशीकट्टे 
चेतनने जेल ब्रेक करण्यास होकार देताच त्याला राजा गौसने मध्यप्रदेशातील साथीदारांकडून ५ ते ६ देशीकट्टे दिले होते. जेल ब्रेक यशस्वी झाल्यानंतर राजा चेतनाला ५० लाख देणार होता. तसेच त्यानंतर राजासोबत ‘राईट हॅंड’ म्हणून काम करणार होता. राजा गौसने कारागृहातही यासाठी तयारी केली होती, अशी माहिती आहे. 

पोलिसांवर करणार होते गोळीबार 
दुपारी चेतन आणि टोळी कारागृहाच्या अगदी गेटसमोर येणार होते. मुलाखत कक्षाजवळ राजा उभा राहणार होता. त्यानंतर गौसला बाहेर काढायचे. टोळीने देशी कट्ट्याने पोलिसांवर गोळीबार करायचा. कारागृहाबाहेर दोन पल्सर उभ्या ठेवायच्या आणि दोन वेगवेगळ्या दिशेने पळून जायची योजना चेतनने आखली होती. 

गुन्हे शाखेने उधळला डाव 
गुन्हे शाखेच्या एका हवालदाराला जेलमधील खबऱ्याने राजा गौसच्या प्लॅनची माहिती दिली. एक एपीआय आणि हवालदाराने चेतनचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर चेतनकडून गुन्हे शाखेने देशीकट्टा जप्त केला. त्याने जेल ब्रेक करण्याचा कट रचल्याची कबुली दिली. त्यानंतर प्रशासनाला राजा गौसबाबत माहिती देण्यात आली. गौसला लगेच दुसऱ्या बरॅकमध्ये हलविण्यात आले होते.                  (Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com