student organizations should raise issues not make threats said uday samant | Sarkarnama

विद्यार्थी संघटनांनी समस्या मांडाव्या, धमक्या देऊ नये : उदय सामंत

कृष्णा लोखंडे
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी कालच सरकारची भूमिका स्पष्ट केली असून सर्व पक्षांचे नेते स्थगिती उठविण्याचे प्रयत्न करणार आहेत, असे सांगितले.

अमरावती : आपल्या समस्या आणि शक्य असेल तर त्यावरील उपाययोजनाही विद्यार्थी संघटनांनी सुचवाव्या. विद्यार्थ्यांकडून हीच अपेक्षा आहे. मी त्यांना भेटायला तयार होतो. तरीही त्यांनी धमकी दिली. आपण आपले काम चांगले करत असताना कुणाच्या धमक्या कशा सहन करायच्या, असा प्रश्‍न करीत विद्यार्थी संघटनांनी समस्या मांडाव्या, धमक्या देऊ नये, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेचे चांगले नियोजन केले असल्याची शाबासकीही त्यांनी या वेळी दिली.

उदय सामंत मंगळवारी काल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते. कुलगुरू व परीक्षानियंत्रक यांच्याकडून संपूर्ण माहिती त्यांनी जाणून घेतल्यानंतर सिनेट सभागृहात त्यांनी प्रसार माध्यमासोबत संवाद साधला. ना. सावंत म्हणाले, की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून सत्तर हजार विद्यार्थ्यांपैकी आठ ते दहा टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेबाबत अडचणी जाणार आहेत. त्यांची परीक्षा कशी घ्यायची याचेही नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व खुद्द विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केली असून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी सरकार व शासन पाठीशी आहे.

विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे कुणी राजकारण करू नये. या संघटनांना मी भेटण्याची तयारी दर्शविली होती. त्यांनी माझी गाडी अडविण्याची तयारी केली. मला नागपूरला पोहोचू देणार नाही, अशी धमकी दिली ते योग्य नाही. ते सहन केले जाणार नाही. लोकशाही आहे, मत मांडायला यावे, असे आवाहन करतानाच त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला टोला हाणला. मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी कालच सरकारची भूमिका स्पष्ट केली असून सर्व पक्षांचे नेते स्थगिती उठविण्याचे प्रयत्न करणार आहेत, असे सांगितले.

अकरावीपासून स्पर्धा परीक्षांची तयारी
केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी मागे पडू नये, यासाठी जिल्हास्तरावर परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी शिक्षणमंत्र्यांनी दिली. सोबतच इयत्ता अकरावीपासून स्पर्धा परीक्षांचा विषय ऐच्छिक स्वरूपात अभ्यासक्रमात जोडता येईल का? यावर मंथन करण्यात येत असून त्यासाठी अभ्यास समिती नियुक्त करण्यात आली आहे, असेही ना. सावंत यांनी सांगितले.

आंदोलक स्थानबद्ध
उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांना घेराव घालण्यासाठी तयारी केलेल्या विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी आधीच स्थानबद्ध केले. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासह इतर सर्व ठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या सुरक्षेच्या या उपाययोजनांमुळे आंदोलकांचा बेत बारगळला.        (Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख