शिवसेनेच्या दुसऱ्या शहराध्यक्षाची खंडणीची क्लिप व्हायरल... - shiv senas second city presidents ransom clip goes viral | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेच्या दुसऱ्या शहराध्यक्षाची खंडणीची क्लिप व्हायरल...

अतुल मेहेरे
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करताना खबरदारी घेणे अपेक्षित होते. पण नितीन तिवारी यांची निवड करताना तशी कुठलीही खबरदारी घेतली गेली नसल्याचे या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवरुन जाणवत आहे. यासंदर्भात अद्याप पुढे काही कार्यवाही झाल्याची माहिती नाही.

नागपूर : शिवसेनेचा माजी शहरप्रमुख मंगेश कडव याच्यावर खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात त्याने जेलची हवासुद्धा खाल्ली आहे. नवीन कार्यकारिणीत निवड झालेला शहरप्रमुख नितीन तिवारी हा सुद्धा खंडणीबाज असल्याची माहिती पुढे येत आहे. नुकतीच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, त्यामध्ये नितीन तिवारी याचा अभय मेश्राम नामक व्यक्तीसोबत खंडणीच्या वाटपासंदर्भातील संवाद झाल्याचे सांगण्यात येते.  

व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप दीड वर्षापूर्वीची असल्याची माहिती आहे. खंडणीबाज असलेल्या व्यक्तीला शिवसेनेचा शहरप्रमुख बनवल्यामुळे शिवसेनेबद्दल उलटसुलट चर्चा शहरात सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखावर आणि युवा सेनेच्या माजी प्रमुखावरही विविध गुन्हे दाखल आहेत आणि आता पुन्हा खंडणीबाजालाच शहरातील महत्वाचे पद दिल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. या क्लिपमुळे नवनियुक्त शहरप्रमुख नितीन तिवारी अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

ऑडिओ क्लिपमध्ये दोन व्यक्तींचे आवाज आहेत. त्यातील एक नितीन तिवारी आणि दुसरा अभय मेश्राम असल्याची माहिती आहे. वसूल केलेल्या खंडणीची वाटणी कशी केली, याबाबत हे दोघे चर्चा करीत आहेत. चर्चेमध्ये खंडणीचाच आरोप असलेला शिवसेनेचा माजी पदाधिकारी चिंटू महाराज याच्याही नावाचा उल्लेख आहे. याशिवाय खंडणीतून उकळलेली रक्कम सात लोकांमध्ये कशी वाटली गेली, असेही सांगितले गेले आहे. हे संभाषण ऐकल्यानंतर खंडणी वसुलीतून मिळालेल्या रकमेच्या वाटणीबाबत दोघे चर्चा करीत असल्याचे स्पष्टपणे जाणवते. हितेश यादव यांसह इतरही लोकांची नावे यामध्ये घेतलेली आहेत. 

मंगेश कडवचे प्रकरण जेव्हा उघडकीस आले होते, तेव्हा जिल्हाप्रमुख आणि माजी खासदार प्रकाश जाधव यांनाही शिवसेनेने स्थगित ठेवले होते. त्यानंतर कडव प्रकरण चांगलेच गाजले. शिवसेनेची मोठी बदनामी त्यावेळी झाली. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करताना खबरदारी घेणे अपेक्षित होते. पण नितीन तिवारी यांची निवड करताना तशी कुठलीही खबरदारी घेतली गेली नसल्याचे या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवरुन जाणवत आहे. यासंदर्भात अद्याप पुढे काही कार्यवाही झाल्याची माहिती नाही. पक्षश्रेष्ठी हे प्रकरण कशा प्रकारे हाताळतात, हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.

अजिबात खपवून घेणार नाही : प्रमोद मानमोडे
ही ऑडिओ क्लिप दीड वर्षांपूर्वीची असल्याची माहिती आहे. यापूर्वी काय काय झाले त्याबाबत मला फार माहिती नाही. पण महानगर प्रमुख म्हणून जेव्हापासून मी कार्यभार सांभाळला त्यानंतर माझ्या कारकि‍र्दीत असले प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाही. येथून पुढे माझ्या माहितीत असा प्रकार आल्यास तो कुणीही असो, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नवनियुक्त महानगरप्रमुख प्रमोद मानमोडे यांनी दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख