माजी जिल्हाप्रमुखांना केले सहसंपर्क्रमुख, शिवसेनेत उफाळला असंतोष - senior workers are demoted dissatisfaction erupted in shiv sena | Politics Marathi News - Sarkarnama

माजी जिल्हाप्रमुखांना केले सहसंपर्क्रमुख, शिवसेनेत उफाळला असंतोष

राजेश चरपे 
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

शिवसेनेचे नवनियुक्त सह संपर्कप्रमुख सतीश हरडे यांनी आपला नाराजीनामा शहराचे संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांना व्हॉटस्ॲपवपर पाठवला आहे. मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनासुद्धा त्यांनी आपली नाराजी कळवल्याचे समजते. हरडे नागपूरचे जिल्हाप्रमुख तसेच गोंदिया जिल्ह्याचे संपर्कप्रमुख होते.

नागपूर : शिवसेनेची महानगर कार्यकारिणी गठीत करताना ज्येष्ठ शिवसैनिकांना पदावनत केल्यामुळे असंतोष उफाळला आहे. माजी जिल्हाप्रमुखांना मोठे पद देण्याऐवजी सह संपर्कप्रमुख पद देऊन डिमोशन केल्यामुळे या कार्यकारिणावरून नाराजी आहे. कार्यकारीणी निवडताना दक्षिण आणि पूर्व नागपूर विधानसभा मतदासंघांवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघावर शिवसेना दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

माजी उपमहापौर शेखर सावरबांधे जिल्हाप्रमुख होते. त्यांनी पूर्व आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली आहे. पूर्व नागपूरमधून शिवसेनेचे उमेदवार असताना माजी मंत्री व तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार सतीश चतुर्वेदी यांना त्यांनी चांगलाच घाम फोडला होता. बसपच्या उमेदवाराने त्यांचा विजयाचा घास हिरावून घेतला. त्यानंतर दक्षिणेतून माघार घेण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे त्यांच्या घरी आले होते. सतीश हरडे हे नागपूरचे जिल्हाप्रमुख होते. गोंदिया जिल्ह्याचे संपर्कप्रमुख होते. मध्य नागपूरमधून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढली आहे. सह संपर्कप्रमुख करून त्यांचीही पदावनती करण्यात आली आहे. 

दक्षिणेचे राजकारण 
शेखर सावरबांधे दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे दावेदार ठरू शकतात. त्यामुळे त्यांना दक्षिणऐवजी पूर्व आणि पश्चिम विधानसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दक्षिण नागपूरमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. याच भागात त्यांचे कार्य व संपर्कही आहे. ते दक्षिण अधिक बळकट करू शकले असते. नवनियुक्त महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे हेही दक्षिण नागपूरमध्ये राहतात. त्यांचा याच मतदारसंघावर दावा आहे. त्यांनी स्वबळावर येथून विधानसभेची निवडणूक लढली होती. भविष्यात दक्षिणेत दावेदार वाढू नये, याचीही खबरदारी घेण्यात आली असल्याचे समजते. येथील दावेदार माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांना मात्र दक्षिणसह मध्यच्याही संपर्कात ठेवले आहे. अनेक दिवसांपासून कोणाच्याच संपर्कात नसलेले विशाल बरबटे यांना उत्तर व पूर्वचे, किशोर पराते यांना पश्चिम व मध्य, मंगेश काशीकर यांना दक्षिण-पश्चिम व दक्षिणचे महानगर संघटक करण्यात आले आहे.

हरडेंचा नाराजीनामा 
शिवसेनेचे नवनियुक्त सह संपर्कप्रमुख सतीश हरडे यांनी आपला नाराजीनामा शहराचे संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांना व्हॉटस्ॲपवपर पाठवला आहे. मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनासुद्धा त्यांनी आपली नाराजी कळवल्याचे समजते. हरडे नागपूरचे जिल्हाप्रमुख तसेच गोंदिया जिल्ह्याचे संपर्कप्रमुख होते. सहसंपर्क प्रमुख करून पदावनत केल्याने त्यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दांत व्यक्त केली. सहसंपर्क प्रमुख म्हणून मी काम करण्यास उत्सुक नाही. त्यामुळे मला या पदावरून कार्यमुक्त करावे आणि दुसऱ्या व्यक्तीची निवड करावी, असे त्यांनी आपल्या मेसेजमध्ये म्हटले आहे. हरडे यांच्यामुळे इतर नाराज पदाधिकारीसुद्धा राजीनामा देण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन बंद होता.  (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख