फडणविसांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राला राजेश टोपेंनी दिले ‘हे’ उत्तर - rajesh tope replied to the letter given by fadnavis to the chief minister | Politics Marathi News - Sarkarnama

फडणविसांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राला राजेश टोपेंनी दिले ‘हे’ उत्तर

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

तत्काळ गडचिरोली जिल्ह्याचे  पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक जयस्वाल यांना याप्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याचे व दोषींवर कारवाई निर्देश दिले होते. याप्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये,

नागपूर : राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी ४०० कोटी रुपयांचे कलेक्शन केले जात आहे. यासंदर्भात राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातूनच पत्र लिहिले. यावर मागील सरकारच्या कार्यकाळात मंत्रीगटाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी मंत्रीगटाची नेमणूक केली होती आणि तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार त्याचे अध्यक्ष होते, असे उत्तर दिले आहे. 

फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात ४०० कोटी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा आरोप केला आहे. या पत्राला उत्तर देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वस्तुस्थिती स्पष्ट करणारी माहिती दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत मागील शासनाने मंत्रीगटाची नेमणूक केली होती. तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार त्याचे अध्यक्ष होते. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत या मंत्रीगटाने शिफारस केली होती. ही कार्यवाही गेल्या वेळेच्या शासन काळातच सुरू झाली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी रक्कम गोळा केल्याबाबतची माहिती मला गेल्या महिन्यात गडचिरोली भागातून प्राप्त झाली होती. मी तत्काळ गडचिरोली जिल्ह्याचे  पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक जयस्वाल यांना याप्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याचे व दोषींवर कारवाई निर्देश दिले होते. याप्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागात कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत विविध विभागांच्या अभिप्रायाने सामान्य प्रशासन विभागामार्फत सर्वसमावेशक धोरण करण्याचे प्रस्तावित असल्याचे आरोग्यमंत्री यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवल्यानंतर काहीच वेळात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. आता यावर फडणवीस पुन्हा पत्र पाठवतील, असा अंदाज लावला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात पत्रयुद्ध सुरू होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 
(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख