public curfew on saturdays and sundays in the nagpur | Sarkarnama

उपराजधानी धास्तावली, यापुढे शनिवार आणि रविवारी जनता कर्फ्यू

अतुल मेहेरे
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

३४१ नवीन डॉक्टर्स उपलब्ध झाल्यामुळे मेयो, मेडिकल, शालिनीताई मेघे रुग्णालयात येत्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्या-त्या रुग्णालयांत या डॉक्टरांची सेवा घेतली जाणार असल्याची सकारात्मक बाब आजच्या बैठकीतून समोर आली आहे.

नागपूर : कोरोनाचे संक्रमण काही केल्या आटोक्यात येत नाहिये. बाधित आणि मरणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आज नागपुरात कोरोनामुळे ६० जणांचा मृत्यू झाला. शहरात लॉकडाऊन करायचे की नाही, याबद्दल विविध मतप्रवाह आहेत. आज महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण बी. यांच्या कक्षात झालेल्या महत्वाच्या बैठकीत पुढील दोन आठवडे शनिवार आणि रविवार, असे दोन दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. 

महापौर जोशी म्हणाले, शहरात जनता कर्फ्यू लावण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे. त्यामुळे आज झालेल्या बैठकीत शहरातील आमदार, महापालिकेतील पदाधिकारी, आयुक्त, तिन्ही अतिरिक्त आयुक्त या सर्वांनी कोरोनाचे वाढते संक्रमण, झपाट्याने वाढत चाललेली मरणाऱ्यांची संख्या आणि त्यासाठी करावयाच्या उपाययोजना या विषयांवर चर्चा केली. या बैठकीतही लॉकडाऊन लावायचा की नाही, यासंर्भात विभिन्न मतप्रवाह पुढे आले. संक्रमण सतत वाढत असताना लॉकडाऊन केले तर ते योग्य होणार नाही. कारण त्यामुळे अडचणी वाढतील, असे आयुक्तांचे मत पडले. लोकप्रतिनिधींही त्यावर आपले म्हणणे मांडले. 

चर्चेअंती शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. हा कर्फ्यू ३० सप्टेंबरपर्यंत, म्हणजे येणाऱ्या दोन शनिवार आणि रविवारी राहणार आहे. हा जनता कर्फ्यू पुढील बैठक घेऊन पुन्हा वाढवायचा आहे. यापुढील प्रत्येक शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू लावायचा, असा निर्णय पुढील बैठकीत घेण्यात येणार आहे. यासोबत रुग्णवाहिका आणि शववाहिकांची स्थिती काय आहे, हे जाणून घेऊन रुग्णवाहिका वाढविण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. एम.जी. एम.एस. झालेले ३४१ डॉक्टर्स महानगरपालिकेच्या सेवेत लवकरच रुजू होणार असल्याचेही महापौर जोशी यांनी सांगितले. 

सद्यस्थितीत शासकिय आणि खासगी रुग्णालयांत बेड्स उपलब्ध होत नाहियेत. पण ३४१ नवीन डॉक्टर्स उपलब्ध झाल्यामुळे मेयो, मेडिकल, शालिनीताई मेघे रुग्णालयात येत्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. त्या-त्या रुग्णालयांत या डॉक्टरांची सेवा घेतली जाणार असल्याची सकारात्मक बाब आजच्या बैठकीतून समोर आली आहे. कोविड रुग्णांना न स्विकारणाऱ्या शहरातील ६३७ नोंदणीकृत खासगी रुग्णालयांना नोटीस देणे सुरू झालेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्या खासगी रुग्णालयांमध्येही बेड्स उपलब्ध होतील, अशी आशा महापौर जोशी यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख