प्रणवदांनी नागपुरात संघाच्या व्यासपीठावरून दिला होता ‘हा’ इशारा 

महाल परिसरातील शिर्के गल्लीतील डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानाला प्रणवदांनी भेट दिली होती. या भेटीत त्यांनी संघकार्याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी नोंदवहीत मुखर्जी यांनी अभिप्राय नोंदवला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार भारतमातेचे थोर सुपुत्र आहेत, अशी नोंद त्यांनी नोंदवहीत केली होती.
pranab
pranab

नागपूर : विविध मुद्द्यांवरील हिंसक प्रतिक्रियांमुळे सामाजिक परिस्थिती बिघडत आहे. त्यामुळे भय आणि अविश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीतून संवादाचे सर्व मार्ग अनुसरून देशाला बाहेर काढले, तरच संपूर्ण समाज लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकेल, असे प्रणव मुखर्जी नागपुरात रा. स्व. संघाच्या व्यासपीठावरून म्हणाले होते. कोणत्याही प्रकारची कट्टरता तसेच धर्म वा असहिष्णुतेच्या भावनेवर आधारित या राष्ट्राची व्याख्या करण्याचा प्रयत्न केल्यास आपले देश म्हणून असलेले अस्तित्वच धोक्‍यात येईल, असा इशारा प्रणव मुखर्जी यांनी दिला होता.  

७ जून २०१८ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मुखर्जी यांना निमंत्रित करण्यात आले होते. ते संघाच्या कार्यक्रमाला येणार म्हणून मोठा वादंग निर्माण झाला होता. संघाचे निमंत्रण स्वीकारल्यामुळे काँग्रेसमध्येही नाराजीचा सूर उमटला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, वैविध्य आणि सहिष्णुतेत भारताचा आत्मा दडला आहे. लोकशाहीमध्ये चर्चा होईल, काही मतांशी आपण सहमत असू, काहींशी नाही. पण, मत व्यक्त करण्याचा अधिकार आपण नाकारू शकत नाही. 

अपेक्षांचा फुगा 
मुखर्जी यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर काँग्रेसमधील अनेकांनी पत्र पाठवून या निर्णयाचा फेरविचार करण्याचा सल्ला त्यांना दिला होता. त्यावर नागपुरातच भूमिका मांडेन, असे त्यांनी स्पष्ट केले होते. प्रणवदांकडून ही अपेक्षा नव्हती, असे मत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी व्यक्त केले होते. तर संघाला कुणीही परके नसल्यामुळे प्रणवदांना दिलेल्या निमंत्रणावरून झालेले वाद निरर्थक असल्याचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या कार्यक्रमात सांगितले. 

मुखर्जींसाठी परंपरा बाजूला 
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासाठी संघाने सोहळ्यामधील परंपरा बाजूला ठेवली. संघाच्या परंपरेनुसार प्रमुख पाहुण्यांचे भाषण पहिले होते आणि शेवटी सरसंघचालकांचे. मात्र, ही परंपरा बाजूला ठेवत सरसंघचालकांनी पहिले भाषण केले. मुखर्जी यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. 

हेडगेवार निवासस्थानाला भेट 
महाल परिसरातील शिर्के गल्लीतील डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानाला प्रणवदांनी भेट दिली होती. या भेटीत त्यांनी संघकार्याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी नोंदवहीत मुखर्जी यांनी अभिप्राय नोंदवला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार भारतमातेचे थोर सुपुत्र आहेत, अशी नोंद त्यांनी नोंदवहीत केली होती.       (Edited By : Atul Mehere) 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com