मंत्री यशोमती ठाकूर यांच्या शिक्षेबाबत पुढील आठवड्यात होणार सुनावणी - minister yashomati thakurs sentence will be heard next week | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्री यशोमती ठाकूर यांच्या शिक्षेबाबत पुढील आठवड्यात होणार सुनावणी

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

अमरावती सत्र न्यायालयाने यशोमती ठाकूर यांच्यासह तिघांना तीन महिने सश्रम कारावास, प्रत्येकी १५ हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात करण्यात आलेल्या अपिलावर गुरुवार २२ रोजी सुनावणी होऊन शिक्षेला स्थगिती देण्यात आली होती.

नागपूर : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने १५ ऑक्टोबरला ती महिने कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर जामीन मिळवून यशोमती ठाकूर यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. उच्च न्यायालयाने २२ ऑक्टोबरला स्थगिती देत राज्य सरकारला नोटीस बजावली होती. आता या प्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. 

सरकारी वकिलांनी ऑनलाइन दाखल केलेले शपथपत्र तसेच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वकिलांनी यापूर्वीच्या निकालांचे सादर केलेले दाखले न्यायालयापुढे येऊ न शकल्याने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. वाहतूक पोलिसाला मारहाणप्रकरणी यशोमती ठाकूर यांना अमरावती सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवार, २२ रोजी झालेल्या सुनावणीत स्थगिती देत राज्य सरकारला नोटीस बजावत २७ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यावर मंगळवारी न्या. विनायक जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. 

शपथपत्र तसेच पूर्वीच्या निकालांचे दाखले सादर होऊ शकले नाही. शिक्षेला स्थगिती नाही दिली तर त्याचे काय अपरिहार्य प्रतिकूल परिणाम होतील, असा प्रश्न न्यायमूर्तीनी ठाकूर यांच्या वकिलांना विचारला. त्यावर पुढील सुनावणीत सविस्तर युक्तिवाद सादर करू, असे वकिलांनी सांगितले. यशोमती ठाकूर यांच्याकडून वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी व अधिवक्ता अनिकेत उज्वल निकम यांनी बाजू मांडली. अमरावती सत्र न्यायालयाने यशोमती ठाकूर यांच्यासह तिघांना तीन महिने सश्रम कारावास, प्रत्येकी १५ हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात करण्यात आलेल्या अपिलावर गुरुवार २२ रोजी सुनावणी होऊन शिक्षेला स्थगिती देण्यात आली होती.

२४ मार्च २०१२ रोजी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास तत्कालीन आमदार यशोमती ठाकूर आपल्या चार साथीदारांसह टाटा सफारी कारने चुनाभट्टी मार्गाने जात होत्या. वनवे असल्यामुळे ड्यूटीवर तैनात वाहतूक पोलिस कर्मचारी उल्हास रौराळे यांनी त्यांना या मार्गाने जाण्यास विरोध केला. आधी वाहनचालकासह तिघांनी खाली उतरून वाहतूक पोलिस रौराळे यांच्यासोबत वाद घातला. परंतु ते आपल्या कारवाईवर ठाम होते. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी खाली उतरून रौराळेंसोबत वाद घातला व त्यांना रस्त्यावर थापड मारली. झटापटीत पोलिसाचे कपडेही फाटले होते. त्यानंतर रौराळे यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी यशोमती ठाकूर यांच्यासह चौघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासह मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख