विधानपरिषद निवडणूक : विदर्भातून आश्चर्यकारकरीत्या पुढे येणार एक नाव ! - legislative assembly elections a name will come out surprisingly from vidarbha | Politics Marathi News - Sarkarnama

विधानपरिषद निवडणूक : विदर्भातून आश्चर्यकारकरीत्या पुढे येणार एक नाव !

अतुल मेहेरे
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

कॉंग्रेसकडून विधानपरिषदेवर निवड करायचे असलेल्या उमेदवारांची यादी २ किंवा ३ नोव्हेंबरपर्यंत मुंबईला येण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील एक नाव अनपेक्षितपणे आणि तेही अगदी वेळेवर पुढे येण्याची पूर्ण शक्यता आहे.

नागपूर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या राज्यपाल कोट्यातील रिक्त झालेल्या १२ जागांसाठी निवड प्रक्रियेला वेग येऊ लागला आहे. आज मुंबईला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत यासंदर्भात बैठक होणार असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष प्रत्येकी चार नावांची यादी मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून विदर्भाला प्रतिनिधित्व देण्याची शक्यता कमीच दिसतेय. पण कॉंग्रेसकडून विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील अग्रणी आणि आजपर्यंत चर्चेतही नसलेले एक नाव वेळेवर अनपेक्षितपणे, आश्चर्यकारकरीत्या समोर येण्याची दाट शक्यता विश्‍वसनीय सूत्रांनी वर्तविली आहे. याशिवाय पुणेच्या साहित्य क्षेत्रातील एक नाव अनपेक्षितपणे पुढे येण्याचीही शक्यता आहे.

राज्यपाल भगतसिंह कोशियारी आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचे संबंध कसे आहेत, हे एव्हाना राज्याने पाहिले आहे. राज्यपाल नियुक्त आमदार हे समाजसेवा, साहित्य, कला व क्रीडा या क्षेत्रातील असावे, असा निकष आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांकडून अशाच व्यक्तींची नावे पाठविण्यात येणार, हे निश्‍चित झाल्यासारखेच आहे. याचे कारण म्हणजे राज्यपालांना एकही नाव रद्द करण्याची संधी मिळता कामा नये, याची सर्व खबरदारी तिन्ही पक्ष घेत आहेत. कॉंग्रेसकडून युवक कॉंग्रेसचे नेतृत्व करणारे सत्यजीत तांबे, प्रवक्ता सचिन सावंत, कॉंग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढलेल्या अभिनेत्री ऊर्मीला मार्तोंडकर, रजनी पाटील यांची नावे पुढे आली आहे. यांसोबतच मुजफ्फर हुसेन, नसीम खान आणि भालचंद्र मुणगेकर हीसुद्धा नावे चर्चेत आली आहेत. 

कॉंग्रेसचे शेवटच्या क्षणापर्यंत काही खरे नसते, हे एका ज्येष्ठ नेत्याने काल सांगितले. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉंग्रेसकडून विधानपरिषदेवर निवड करायचे असलेल्या उमेदवारांची यादी २ किंवा ३ नोव्हेंबरपर्यंत मुंबईला येण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील एक नाव अनपेक्षितपणे आणि तेही अगदी वेळेवर पुढे येण्याची पूर्ण शक्यता आहे. कारण विदर्भातून एक तरी आमदार म्हणून विधानपरिषदेवर जाणार, हे काल विदर्भातील एका महत्वाच्या नेत्याने ‘सरकारनामा’ला सांगितले. त्यामुळे सूत्रांनी दिलेल्या माहितीला बळ मिळते. 

विदर्भातून आमदार म्हणून विधानपरिषदेवर पाठविण्यासाठी ज्या नावावर जोरदार चर्चा सुरू आहे, हा व्यक्ती विदर्भातील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ दिवंगत नेत्याचा निकटतम कार्यकर्ता राहिलेला आहे. तेव्हा हा कार्यकर्ता युवक कॉग्रेसचा अध्यक्ष होता. गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटीचा सचिव म्हणून काम केलेले आहे. याशिवाय वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रभारी म्हणूनही काम केलेले आहे आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. सुरुवातीपासून पक्षाशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे राज्यपालांकडून नियुक्त करावयाचे निकष हा कार्यकर्ता पूर्ण करतो. विदर्भातून कॉंग्रेसचा एक आमदार विधानपरिषदेवर जाणार, या चर्चेने जोर धरला आहे. 
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख