राष्ट्रवादी काँग्रेसची काही नाराजी असेल तर ती दूर केली जाईल  ः बाळासाहेब थोरात  - if the ncp has any grievances, it will be removed said balasaheb thorat | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसची काही नाराजी असेल तर ती दूर केली जाईल  ः बाळासाहेब थोरात 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड आहे, असे जे सांगितले जाते, हा इतिहास झाला, आता यावेळी आमचा उमेदवार जिंकेल, हे नक्की आहे. अभिजीत वंजारी गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून या निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यांचा संपर्क दांडगा आहे आणि महाविकास आघाडीतील सर्व मंत्री, नेते, कार्यकर्ते त्यांच्यासाठी संपूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरले आहेत.

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीने तरुण तडफदार उमेदवार दिला आहे. त्यामुळे यावेळी या मतदारसंघात अभिजित वंजारी यांच्या रुपाने विजय आमचाच होईल, असा विश्‍वास आज राज्याचे महसूल मंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी थोरात नागपुरात आले आहेत. 
 
श्री थोरात म्हणाले राष्ट्रवादी कॉंग्रेसची या निवडणुकीबाबत काही नाराजी असली तर ती दूर करण्यात येईल. महाविकास आघाडीतील सर्व मंत्री, नेते अगदी गावपातळीवरील कार्यकर्तेसुद्धा ताकदीने ही निवडणूक लढणार आहेत. नागपुरात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अभिजित वंजारी यांना उमेदवारी जाहीर तर झाली. मात्र, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अहीरकर यांनी विदर्भात काँग्रेस राष्ट्रवादीला दुय्यम स्थान देत असल्याचा आरोप करत आपला उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी महाविकासआघाडीत कुठलेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले.

येत्या एक डिसेंबर नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यासाठी काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आज नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवस आहे. वंजारींचा अर्ज दाखल करताना आज मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत. त्यांचा चांगला कॉन्टॅक्ट आहे. त्यांचे नॉमिनेशन आम्ही आज दाखल करत आहोत. महाविकास आघाडीमध्ये कुठलीही नाराजी नाही. आम्ही सर्व मिळून निवडणूक लढवत आहोत आणि आमच्या सर्वच जागा जिंकून येतील, असा विश्वास यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

भाजपचा गड, हा इतिहास झाला
पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड आहे, असे जे सांगितले जाते, हा इतिहास झाला, आता यावेळी आमचा उमेदवार जिंकेल, हे नक्की आहे. अभिजीत वंजारी गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून या निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यांचा संपर्क दांडगा आहे आणि महाविकास आघाडीतील सर्व मंत्री, नेते, कार्यकर्ते त्यांच्यासाठी संपूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरले आहेत, असेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.               

(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख