नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे २२ जुलैला नागपुरात आगमन झाले. सध्या ते नागपूर मुक्कामी आहेत. मुंबईच्या राजभवनात १८ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे त्यांनी नागपुरात राहण्याचे पसंत केले. मुंबईच्या राजभवनातील परीस्थिती नियंत्रणात येईपर्यंत ते उपराजधानीत राहणार असलयाचे सांगण्यात येते. येथील मुक्कामात त्यांनी आज दिक्षाभूमी आणि संघाच्या स्मृती मंदीर परीसराला भेट दिली.
ज्या दिवशी राज्यपालांचे नागपुरात आगमन झाले, त्या दिवशी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आगमन आणि राजभवनकडे प्रयाण', येवढाच त्यांचा दौरा कळवण्यात आला होता. राज्यपाल कोश्यारी यांनी आज सकाळी सर्वप्रथम नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदीर परिसराला भेट दिली. डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधीस्थळांचं दर्शन घेतलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा आढावा घेतला.
वेळी संघ स्मृती मंदिर परिसरातील वरिष्ठ संघ स्वयंसेवकांनी राज्यपालांचं स्वागत केलं. कोरोना काळात देशभरात संघातर्फे सुरू असलेल्या विविध कार्याची माहिती स्वयंसेवकांनी त्यांना दिली. त्यानंतर राज्यपालांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थीकलशाचं दर्शन घेतलं. तसंच परिसराची पाहणी करून दीक्षाभूमीवर होत असलेल्या विकास कार्याची माहिती जाणून घेतली.

