ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना थेट मदत द्या : देवेंद्र फडणवीस  - give direct help to farmers by declaring wet drought said devendra fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना थेट मदत द्या : देवेंद्र फडणवीस 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

मराठवाड्यातील प्रश्न फारच गंभीर आहेत. तेथे तातडीने मदत पोहोचविण्याची गरज आहे. आधीच कोरोनामुळे राज्यातील प्रत्येक घटक हवालदिल झाला असल्याने, या संकटातून शेतकरी उभा करायचा असेल तर आता तरी नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळेल, याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे.

मुंबई : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दैना उडवली आहे. या पावसाने मराठवाडा. पश्‍चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांत अक्षरशः हाहाकार माजवला. विविध वृत्तवाहिन्यांवर शेतकऱ्यांची स्थिती दाखवली जात आहे. पण राज्य सरकारला अद्यापही पाझर फुटलेला नाही. या नुकसानाची व्याप्ती फार मोठी आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकऱ्यांना थेट मदत देण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, गेल्या 3/4 दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः: हाहा:कार माजविला. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी मदतीसाठी आर्जव करतो आहे. विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. पण, राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत, यापलीकडे काहीही शब्द सरकारकडून दिला जात नाही. प्रत्यक्षात पंचनामेही होत नाहीत आणि शेतकऱ्यांना मदत तर मिळतच नाही. अन्नदात्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे. 

कोकणात धान, मराठवाड्यात सोयाबीन, विदर्भात सोयाबीन, कपाशी, ज्वारी आणि धान अशा पिकांना मोठा फटका बसला आहे. कोकणात निसर्ग चक्रीवादळ, विदर्भातील पूर, मराठवाड्यातील अतिवृष्टी यांपैकी एकाही प्रसंगात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिले नाही. आता पुन्हा परतीच्या पावसाने सोयाबीन, कपाशी, धान इत्यादी पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, तसेच विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. 

औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, नांदेडमध्ये सोयाबीन पिकांना कोंब फुटली आहेत. अहमदनगर जिल्ह्यात खरिपाचे सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी काढणीला आले असताना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. अनेक तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव, परळी तालुक्याला मोठा फटका बसला आहे. पीक काढणीचे काम सुरू असतानाच हा तुफान पाऊस झाल्याने आता शेतकऱ्यांच्या हाती पीक लागणार नाही. सोयाबीनच्या लागवडीचाही खर्च निघणार नाही, अशी स्थिती आहे. विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर तो टाहो फोडून ओरडत आहे. मदतीसाठी आर्जव करीत आहे आणि जुनीच मदत मिळाली नसल्याने आता जगायचे तरी कसे, असा त्याचा प्रश्न आहे. 

जवळपास अशीच स्थिती विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आहे. भंडारा-गडचिरोली-गोंदिया या जिल्ह्यांमध्ये भातपिकाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात तर जवळपास १०-१२ दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. धान, सोयाबीन अशा दोन्ही पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनला कोंब आणि कपाशीला बुरशी लागली. म्हणजे कोणतेच पीक हाती नाही. ज्वारी सुद्धा मातीमोल झाली आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणतात.

कोकणातील जिल्हे आणि पालघरमध्ये भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे धान कापले तरी संकट आणि नाही कापले तरी संकट, अशी इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. सातत्याने होणारे नुकसान, त्यात कोणत्याही प्रसंगात मदत न मिळणे, यामुळे अतिशय गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे आ वासून उभे झाले आहेत. अनेक जिल्ह्यांत पूर्वीच्याच पंचनाम्यांनंतर नुकसानभरपाई अजून मिळाली नाही. सातत्याने विनंती करूनही राज्य सरकारकडून कोणतीही मदत दिली जात नाही. बांधावर २५ आणि ५० हजार हेक्टरी मदतीची मिळालेली आश्वासनं स्मरून तर शेतकऱ्यांना आणखी वेदना होत आहेत. 

मराठवाड्यातील प्रश्न फारच गंभीर आहेत. तेथे तातडीने मदत पोहोचविण्याची गरज आहे. आधीच कोरोनामुळे राज्यातील प्रत्येक घटक हवालदिल झाला असल्याने, या संकटातून शेतकरी उभा करायचा असेल तर आता तरी नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळेल, याकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे. नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषांप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख