कोरोनाची धास्ती विसरून हजारो नागपूरकर मुंढेंना निरोप देण्यासाठी रस्त्यावर...

या गर्दीत तुकाराम मुंढेंना निरोप देण्यासाठी एकत्र झालेले लोक येवढे उत्साहात होते की कोरोनाने आपल्या शहराला विळख्यात घेतलंय, याचा त्यांना विसर पडला होता. पोटापाण्याचा प्रश्‍न असल्यामुळे माध्यम प्रतिनिधीही या गर्दीचा हिस्सा बनले होते. पण ज्यांचा असा काही प्रश्‍न नाही, त्यांनी विचार नक्की करायला हवा.
Tukaram Mundhe nirop
Tukaram Mundhe nirop

नागपूर : अतिशय अल्प काळ म्हणजे केवळ सात महिने महानगरपालिकेचे आयुक्त राहिलेले तुकाराम मुंढे यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिवपदी झाली होती. पण दोन दिवसांपूर्वी त्यांच्या त्या बदलीचा आदेशही रद्द झाला. सद्यःस्थितीत त्यांच्यासाठी पोस्ट ठरलेली नाहीये. पण ते आज सहपरिवार मुंबईला रवाना झाले. एखाद्या नेत्याच्या सत्कार समारंभालाही लाजवेल, अशा धडाक्यात प्रचंड गर्दी करून मुंढेंना नागपूरकरांनी निरोप दिला. त्यांच्या वाहनावर फुलांचा वर्षाव करुन त्यांच्याप्रति असलेले प्रेम व्यक्त केले. पण हे करताना त्यांचे समर्थक मुंढेंनी दिलेली शिकवण साफ विसरले आणि कोरोनाची धास्ती विसरुन त्यांच्या निवासस्थानासमोर चिक्कार गर्दी केली. आज मुंढेच आयुक्त असते, तर त्यांनी या गर्दी करणाऱ्यांवर कारवाई निश्‍चितच केली असती.

आपल्या सात महिन्यांच्या नागपुरातील कारकिर्दीत जानेवारीचा शेवटचा आठवडा आणि फेब्रुवारी महिना सोडला तर मुंढेंचा जास्तीत जास्त वेळ कोरोनाशी लढण्यातच गेला. त्यांनी स्वतः रस्त्यांवर उत्तरून जनतेला कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगितले. कोरोनाचा शिरकाव नागपुरात झाल्यानंतर लॉकडाऊन घोषित केल्यावर सुरुवातीच्या दिवसांत मुंढे रोज शहराच्या वेगवेगळ्या भागांत स्वतः फिरायचे. रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना आवाहन करायचे, न ऐकल्यास थेट कारवाई करायचे. आज त्यांच्या आयुक्तांच्या निवासस्थानासमोर जमलेले सर्वच्या सर्व लोक मुंढेंचे समर्थक होते, यात तिळमात्रही शंका नाही. पण ज्यांच्या समर्थनार्थ लोक एकत्र आले, त्यांनी दिलेल्या शिकवणीचे भान या लोकांनी ठेवायलाच पाहिजे होते. 

कोरोना नावाचा विषाणू दिवसेंदिवस रौद्र रूप धारण करतोय. महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महसूल कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, पोलिस विभाग येवढेच काय पण वृत्तपत्र कचेऱ्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केलेला आहे. नागपुरात १५०० पेक्षा जास्त लोक कोरोनाने मरण पावलेले आहेत. काल सकाळपासून शहरातील तीन पत्रकार कोरोनाचे बळी ठरले. अशी गंभीर परिस्थिती असताना शेकडो लोकांनी एकत्र येऊन गर्दी करणे, कितपत योग्य आहे. आज सकाळी आयुक्त कार्यालयासमोरचे चित्र बघून शहरातून कोरोना हद्दपार झाला की काय, असे वाटत होते. 

या गर्दीत तुकाराम मुंढेंना निरोप देण्यासाठी एकत्र झालेले लोक येवढे उत्साहात होते की कोरोनाने आपल्या शहराला विळख्यात घेतलंय, याचा त्यांना विसर पडला होता. पोटापाण्याचा प्रश्‍न असल्यामुळे माध्यम प्रतिनिधीही या गर्दीचा हिस्सा बनले होते. पण ज्यांचा असा काही प्रश्‍न नाही, त्यांनी विचार नक्की करायला हवा. आज जमलेल्या गर्दीत काही कोरोनाबाधित असतील तर या शेकडोंमधून उद्या किती पॉझिटिव्ह निघतील, याची चिंता मात्र या रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांनी बोलून दाखवली. यापुढे तरी लोकांनी अशा प्रकारे गर्दी करू नये, उत्साहावर थोडे नियंत्रण ठेवावे, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग कमी होऊ शकेल. ‘आम्ही तुकाराम मुंढेंचे फॉलोअर’ असे छाती ठोकून सांगणाऱ्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना ‘फॉलो’ केले पाहिजे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com