डॉ. आशीष देशमुख अमरावती शिक्षक मतदारसंघातून लढणार ? - dr ashish deshmukh to contest from amravati shikshak constituency | Politics Marathi News - Sarkarnama

डॉ. आशीष देशमुख अमरावती शिक्षक मतदारसंघातून लढणार ?

अतुल मेहेरे
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून तत्कालिन मुख्यमंत्री आणि भाजपचे हेवीवेट नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढविली. त्यात त्यांना यश आले नाही, पण ज्या पद्ध.ने ते लढले त्याची चर्चा मात्र झाली. या निवडणुकीपूर्वीच त्यांना पक्षाकडून पुनर्वसनाचे आश्र्वासन देण्यात आले होते.

नागपूर : काटोल विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार डॉ. आशीष देशमुख अमरावती शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढणार का? हा प्रश्‍न बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. यावर त्यांनी स्वतः अद्याप चुप्पी तोडलेली नाही. पण डॉ. देशमुख यांनी ही निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली असल्याचे वृत्त हाती येत आहे. 

राज्यपाल कोट्यातून नामनिर्देशित उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव चर्चेत आले होते. त्याचा निर्णय अद्याप येणे बाकी आहे. पण येवढ्यात त्यांनी अचानक अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी चालवल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून कळते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. आशीष देशमुख भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले होते. आपल्या पहिल्यावहील्या आमदारकीची धडाकेबाज सुरूवात केल्यानंतर अल्पावधीतच लोकप्रिय आमदार म्हणून ते नावारुपास आले होते. पण नंतर-नंतर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांचे पटेनासे झाले. त्यानंतर भाजपात त्यांचे मन रमले नाही आणि सरकारचा कालावधी पूर्ण व्हायच्या दोन वर्षांपूर्वीच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. 

फडणवीसांनी दिली होती टक्कर
कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून तत्कालिन मुख्यमंत्री आणि भाजपचे हेवीवेट नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढविली. त्यात त्यांना यश आले नाही, पण ज्या पद्धतीने ते लढले त्याची चर्चा मात्र झाली. या निवडणुकीपूर्वीच त्यांना पक्षाकडून पुनर्वसनाचे आश्र्वासन देण्यात आले होते, ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे यावेळी अमरावती शिक्षक मतदार संघासाठी पक्ष त्यांच्या नावाचा विचार करीत आहे, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. 

नुकत्याच घोषीत झालेल्या शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये थेट मुकाबला होणार, असे चित्र आहे. गेल्या वेळी शिवसेना-भाजप युती समर्थीत शिक्षक आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे अमरावती शिक्षक मतदारसंघात विजयी झाले होते. यावेळी भाजप स्वतंत्र लढणार आहे आणि शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष डॉ. आशीष देशमुख यांना यावेळी संधी देऊन २०१९ मध्ये दिलेला शब्द पूर्ण करणार असल्याचेही त्यांचे समर्थक ठामपणे सांगत आहेत. 

उच्चशिक्षीत उमेदवार
बीई-इंडस्ट्रीयल, एमबीए-फायनान्स, पी.एचडी. असे उच्चशिक्षीत उमेदवार डॉ. आशीष देशमुख आहेत. शिक्षण संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध असल्याने शिक्षकांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव आहे. याशिवाय, व्यसनमुक्ती ते सामूहिक विवाह आदी सर्व प्रकारच्या सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव आहेत. त्यांच्या ‘स्ट्रॉंग नेटवर्क’चा फायदा ते निश्‍चितच घेतील. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख