हिवाळी अधिवेशनाबाबत साशंकता, मात्र तयारी झाली सुरू ! - doubts about winter session but preparations begin | Politics Marathi News - Sarkarnama

हिवाळी अधिवेशनाबाबत साशंकता, मात्र तयारी झाली सुरू !

निलेश डोये
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

रविभवन, नागभवन व आमदार निवासातील निवास वाटपासाठी समिती गठित करण्यासोबत निवास वाटप करण्याच्या सूचना शासन स्तरावरून देण्यात आल्या. मागील अधिवेशनाच्या वेळी फक्त सहाच मंत्री होते. आता त्यात वाढ झाली आहे. त्यामुळे निवास वाटपाच्या रचनेत बदल होणार आहे.

नागपूर : नागपूर कराराप्रमाणे दरवर्षी नागपुरात होणार हिवाळी अधिवेशन यंदा येथे होणार की नाही, याबाबत अद्याप साशंकता आहे. काही कॉंग्रेसच्या नेत्यांनी यावर्षी हिवाळी अधिवेशन घेऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. असे असले तरी प्रशासनाने मात्र तयारी सुरू केली आहे. विधानभवन तसेच परिसराच्या रंगरंगोटीसोबत विविध कामांवर पाच कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात कामे सुरू होणार असल्याची ही माहिती आहे. 

७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. कोरोनाचे सावट असल्याने अधिवेशनावर कोट्यवधींचा खर्च करण्याऐवजी हा खर्च आरोग्य व्यवस्थांवर करावा, मागणी होत आहे. राज्यभरातील लोकप्रतिनिधी, नेते, अधिकारी येथे येणार असल्याने कोरोना पसरण्याची भीती आहे. त्यामुळे कॉंग्रेसने विरोधात भूमिका घेतली आहे. कॉंग्रेसचे काही बडे नेतेही यासाठी अनुकूल नसल्याचे सांगण्यात येते. प्रशासनातील अधिकारी यासाठी सकारात्मक नाही. मात्र, अधिवेशन नागपुरात घेण्याचे जाहीर झाल्यामुळे प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फक्त विधानभवनाची रंगरंगोटी करण्यात येणार आहे. शिवाय देखभाल दुरुस्ती, फर्निचर, मांडव, सॅनिटाझेशन व इतर कामे करण्यात येणार आहेत. यासाठी जवळपास पाच कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सिव्हिल कामे करण्यात येणार आहे. यावर दोन कोटी खर्च करण्यात येणार आहेत. ही कामे पुढील आठवड्यात सुरू होतील. 

निवास वाटप समिती 
रविभवन, नागभवन व आमदार निवासातील निवास वाटपासाठी समिती गठित करण्यासोबत निवास वाटप करण्याच्या सूचना शासन स्तरावरून देण्यात आल्या. मागील अधिवेशनाच्या वेळी फक्त सहाच मंत्री होते. आता त्यात वाढ झाली आहे. त्यामुळे निवास वाटपाच्या रचनेत बदल होणार आहे.
(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख