शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विदर्भात यावे : डॉ. आशिष देशमुख  - chief minister should come to vidarbha to help farmers dr ashish deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विदर्भात यावे : डॉ. आशिष देशमुख 

अतुल मेहेरे
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

मायबाप सरकार येईल आणि मदत करेल, अशी अपेक्षा घेऊन विदर्भातील शेतकरी वाट बघतोय. ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांचं सांत्वन करून मदतीचं आश्वासन दिलं, त्याचप्रमाणे विदर्भातही येऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व योग्य मदत करावी.

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्राचा दौरा करून शेतकऱ्यांचं सांत्वन केलं. विदर्भात सोयाबीन आणि कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्‍यांनी विदर्भाचा दौरा करून येथील शेतकऱ्यांचं सांत्वन करावं आणि त्यांना मदत घोषित करावी, अशी मागणी कॉंग्रेस नेते आणि माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे. 

यंदा मान्सून वेळेवर धडकला. जून, जुलै, ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे आणि परतीच्या सतत झालेल्या पावसामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. नदी, नाले व सर्वच शेतांत तुडुंब पाणी भरले. सोयाबीन व कापसाचे अतोनात नुकसान झाले, पिकं वाहून गेली. या आपत्तीमुळे विदर्भातील नागपूर विभागात ६३ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. पश्चिम विदर्भात ५०,००० हेक्टर पिकांचे नुकसान झालेले आहे. अकोला येथील शहापूर धरणाच्या पाण्यामुळे परिसरातील सर्व पिके वाया गेली. कोविडच्या महामारीने जनता आधीच त्रस्त असताना या आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारतर्फे नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य मदतीची गरज आहे. शेतकऱ्यांवर बँकेचे कर्ज आहे, त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न आ वासून उभा आहे. 

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांसह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापूर व मराठवाड्याच्या उस्मानाबादला नुकतीच भेट दिली. एक-दोन दिवसांत ते कोकणात जाणार आहेत. उद्याच्या कॅबिनेटमध्ये ते या बाबतीत दिलासा देणार आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, पूर्व विदर्भात गेल्या महिन्यात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळं काढणीला आलेलं सोयाबीन पीक नष्ट झालं. सोबतच यलो मोझॅकचा फटका बसल्यानं शेतकऱ्यांच्या हातून संपूर्ण पीक गेलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळं या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. त्यांनाही मदतीची गरज आहे. 

मायबाप सरकार येईल आणि मदत करेल, अशी अपेक्षा घेऊन विदर्भातील शेतकरी वाट बघतोय. ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांचं सांत्वन करून मदतीचं आश्वासन दिलं, त्याचप्रमाणे विदर्भातही येऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व योग्य मदत करावी. जेणेकरून विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये दुर्लक्षित केल्याची भावना निर्माण होणार नाही, अशी मागणी काँग्रेस नेते डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख