सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 1061 पोलिस हवालदार झाले पीएसआय - after waiting for seven years thousands of police constables became psi | Politics Marathi News - Sarkarnama

सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 1061 पोलिस हवालदार झाले पीएसआय

अनिल कांबळे
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

राज्यातील १०६१ पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्याचे आदेश जारी केले. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या पोलिस उपनिरीक्षकांनी अधिक जोमाने कार्य करा. तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आहे. सर्वांचे हार्दिक अभिनंदन, अशा शुभेच्छा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदोन्नत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

नागपूर : पोलिस हवालदारांची पदोन्नती आज होईल, उद्या होईल असे म्हणता-म्हणता सात वर्ष निघून गेले. पण या कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच आली. सात वर्षांची दीर्घ प्रतीक्षा केल्यानंतर आत्ता कुठे राज्यातील १०६१ हवालदारांना पदोन्नती मिळाली. त्यांच्या लढ्याला न्याय मिळाला. हा लढा ‘सकाळ-सरकारनामा’ने लावून धरत वृत्तमालिका प्रकाशित केली होती. प्रथमच येवढ्या मोठ्या संख्येने पदोन्नती झाल्यामुळे पोलिस दलात राज्यभर आनंदाचे वातावरण आहे.

प्रत्येक पोलिस कर्मचारी अधिकारी होऊन सन्मानाने निवृत्त व्हावा, अशी संकल्पना तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी मांडली होती. त्यानुसार २०१३ ला पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये जवळपास १८ हजार पोलिस हवालदार उत्तीर्ण झाले होते. काहींना पदोन्नती देण्यात येत होती. मात्र तेव्हापासून पदोन्नती देणे थांबविण्यात आले होते. अर्हता परीक्षा उत्तीर्ण हवालदारांना पदोन्नतीसाठीच्या लढ्यात ‘सरकारनामा’ने वृत्तमालिका प्रकाशित करीत पाठपुरावा केला होता. पोलिस महासंचालक, गृहमंत्री ते आस्थापना विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. शेवटी या लढ्याला यश आले. पोलिस महासंचालकांच्या आदेशाने आस्थापना विभाग प्रमुख राजेश प्रधान यांनी आज १०६१ पोलिस हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती दिल्याची यादी प्रकाशित केली. यादी प्रकाशित होताच राज्यातील पोलिसांमध्ये उत्साह निर्माण झाला. अनेकांनी सोशल मिडियावरून एकमेकांना शुभेच्छा दिल्या तर ‘सरकारनामा’वर अभिनंदनाचा वर्षाव झाला. लवकरच हवालदार पीएसआयच्या वर्दीत मुख्यालयात रुजू होणार आहेत.

‘सकाळ-सरकारनामा’वर शुभेच्छांचा वर्षाव
पीएसआय झालेल्या अनेक पोलिस हवालदारांनी ‘सकाळ-सरकारनामा’ वृत्तपत्र कार्यालयाला फोन करून शुभेच्छा दिल्या. तसेच सोशल मिडियावर ‘सकाळ’च्या नावाने अभिनंदन आणि शुभेच्छांचे संदेश फिरत होते. काहींनी तर प्रत्यक्ष ‘सकाळ’ कार्यालयाला भेट देऊन आभार मानले.

गृहमंत्री देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा
राज्यातील १०६१ पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्याचे आदेश जारी केले. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या पोलिस उपनिरीक्षकांनी अधिक जोमाने कार्य करा. तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आहे. सर्वांचे हार्दिक अभिनंदन, अशा शुभेच्छा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदोन्नत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

(Edited By : Atul Mehere) 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख