मुंबई : पाकव्याप्त काश्मीरशी मुंबईची तुलना करणारी अभिनेत्री कंगना रनौत हिच्या निषेधार्थ आज मुंबईत अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी निदर्शने केली. मागाठाणे येथे महिला शिवसैनिकांनी तिच्या फोटोला काळे फासले.
मागाठाणे येथे टाटा पॉवर हाऊस जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन झाले. माजी नगरसेविका व सोलापूर जिल्हा संघटक संजना घाडी तसेच नगरसेविका व विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महिला शिवसैनिकांनी येथे तीव्र आंदोलन केले.
या वेळी शिवसैनिकांनी कंगनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या व फलकही फडकवले. मुंबईत येऊन बॉलीवूडमध्ये नावलौकिक मिळविणाऱ्या कंगनाने मुंबईशी कृतघ्नपणा दाखवला आहे. मुंबईत येण्यापूर्वी कंगना ला कोणीही ओळखत नव्हते. ज्या शहराने तिला प्रसिद्धी, नाव, मानमरातब, पैसा मिळवून दिला, त्याच शहराबद्दल तिने वाईट उद्गार काढले. खरा मुंबईकर याबद्दल तिला कधीही माफ करणार नाही, असे संजना घाडी यांनी या वेळी बोलून दाखवले.
शिवसैनिकांनी कंगनाच्या फोटोला काळेही फासले, नंतर त्या फोटोला जोड्यांना मारून तो फोटो जाळण्यातही आला. या वेळी नगरसेविका रिद्धी खुरसंगे, गीता सिंघण, संध्या दोशी, विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस हजर होते. घाटकोपर, कुर्ला येथेही शिवसैनिकांनी तीव्र निदर्शने केली.
Edited By - Murlidhar Karale

