मुंबई : ``तुम्ही गरीबांना सवलत दिली तर नाहीच, उलट 1 एप्रिलला युनिटमध्ये 40 पैशांनी वाढ केली. सरकारला काहीतरी वाटायला हवं. लाज, लज्जा या शब्दांनी तर आत्महत्याच केली, तुमची अकार्यक्षमता तुम्ही गरीबांवर टाकता,`` अशा शब्दांत भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वीजप्रश्नी सत्ताधाऱ्यांना खडसावले.
मुंबई येथे अधिवाशेनाच्या दुसऱ्या दिवशी मुनगंटीवार यांनी वीजप्रश्नी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. ते म्हणाले, की घरगुती वीज ग्राहक जगातील आपली दोन नंबरची कंपनी आहे. 1 कोटी 97 लक्ष 78 हजार घरगुती ग्राहक आहेत. याच्यासाठी 18.62 टक्के वीज वापरतो. त्यापैकी गरीब लोक 1 कोटी आहेत. वीज सवलत देताना गरीबांना नव्हे, उद्योगासाठी दिली. गरीबांचे आशिर्वाद पुढील जन्मातही कामे येतील, पण उद्योजकांचे याच जन्मात संपतील. वीज दर ठरविताना मुंबईपेक्षा इतर महाराष्ट्राला वेगळा का. वीज बीलाच्या बाबतीत एखादी आयुर्वेदिक औषधी काढावीच लागेल. मला या सरकारचे आश्चर्य वाटते. हीच ती वेळ नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी. फडणवीसांचे सरकार गेले अन फसविणाऱ्यांचे आले. स्व. बाळासाहेबांचा फोटो आहे त्यावर. 300 युनिटपर्यंत वापर करणाऱ्यांसाठी घरगुती दर 30 टक्क्यांनी कमी करणार, असं लिहिलं. हे कशासाठी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तर विधानसभा अध्यक्ष राजीनामा देतील
मुनगंटीवार म्हणाले, की 9 सप्टेंबर 2020 ला एक आध्यादेश काढला. राज्यात उद्भवलेल्या कोरोना विषाणुच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खावटी अनुदान योजनेबाबत हा अध्यादेश होता. तो वाचल्यावर तुम्ही अध्यक्षपदाचा राजीनामा फेकून द्याल. 2013 मध्ये पृथ्वीराज चव्हाण अतिशय नियमात चालायचे. आपण हजारो कोटी रुपये खर्च करतो, तेव्हा डीबीटी केला पाहिजे. तुम्ही द्रोणाचार्यासारखे शांत नका बसू, अध्यक्ष महाराज बोला. खावटी आपण डीबीटी दिली पाहिजे. मला वाटतं की संबंधित सचिवाला जेलमध्ये टाकले पाहिजे. जेव्हा उपमुख्यमंत्री सांगतात 100 कोटी तुम्ही संबंधितांच्या खात्यात टाकले पाहिजे, सचिव का वेगळा अध्यादेश काढतात. आदिवासी बांधव शूर आहे, पर्यावरणावर प्रेम करणारा आहे, त्याची फसवणूक का होते.ही कोणती आदिलशाही, निजामशाही आहे. तुम्ही सांगता त्यांनी वाटाणाच खालला पाहिजे. त्यांना गॅस होत असेल, तर का त्यांनी खावा. त्या सचिवाच्या तोंडावर गॅस सोडायचा ना. अडीचशे कोटीचा प्रश्न होता. का मुंबईवरून वस्तू पाठवायच्या. शिवसेना-भाजपचे लोक विचाराने निर्णय करायचे. पैसे वाचायचे. तुम्ही त्यांना अडचणीत आणता. अजितदादांनीही विरोध केला ना. बारामतीमध्ये आदिवासी बांधव नसताना भूमका घेतली, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.
Edited By - Murlidhar Karale

