नाना पटोले यांचा दिग्रसमध्ये किल्लेदार कोण?

माजी राज्यमंत्री संजय देशमुख आज शनिवारी (ता. १९ जून) काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार का?
Sanjay Deshmukh.jpg
Sanjay Deshmukh.jpg

दिग्रस : दिग्रस विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पंचवीस वर्षापासून ढासळलेला किल्ला आपणास पुनश्च ताब्यात घ्यायचा आहे, असे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पोहरादेवी येथे जाताना दिग्रस येथील विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शना दरम्यान केले खरे, परंतु गेलेला किल्ला जर परत मिळवायचा असेल, तर प्रचंड राजकीय शक्ती असलेला किल्लेदार शोधणे तितकेच महत्त्वाचे आहे.  (Who was the fort keeper of Nana Patole in Digras?)

यामुळेच "नाना पटोले यांचा दिग्रस मध्ये किल्लेदार कोण ?", असा प्रश्न दिग्रसकरांना पडला असून, माजी राज्यमंत्री संजय देशमुख आज शनिवारी (ता. १९ जून) काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार का? अशी चर्चा संपूर्ण दिग्रस विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वीपासून जोमाने सुरू आहे.

काँग्रेसचा अभेद्य गड म्हणून दिग्रस विधानसभा मतदार संघाला ओळखले जायचे. जर का आमदार व्हायचे असेल, तर काँग्रेस पक्षाचे तिकीट घेऊन दिग्रस मतदारसंघांमध्ये निवडणूक लढा व आमदार बना हे समीकरण ठरलेले होते, परंतु काँग्रेसच्या या गडाला पहिल्यांदा सुरूंग लावले ते शिवसेनेचे बाळासाहेब मुनगिनवार यांनी.

१९९४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकावर ठेवून बाळासाहेब मुनगिनवार विजय झाले. त्यानंतर मात्र १९९९ व २००४ असे सलग दोनदा माजी राज्यमंत्री संजय देशमुख दिग्रस येथून निवडून आले. निवडून आल्यानंतर आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीने संजय देशमुख यांनी आपली पाळेमुळे घट्ट केली, परंतु २००९ साली दिग्रस मतदार संघामध्ये दारव्हा व नेर या गावांचा समावेश झाला आणि याच दरम्यान २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे संजय राठोड यांनी संजय देशमुख यांची खोलवर रुजलेली राजकीय पाळेमुळे सैल केलीत व सलग तीन वेळा निवडून येण्याचा बहुमान पटकावला.

दिग्रस विधानसभेची ही राजकीय पार्श्वभूमी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यवतमाळ येथे मुक्कामी असताना जाणून घेतली व दिग्रसच्या भुमित प्रवेश करतात दिग्रसला हा गड परत मिळवायचा, असा मनसुबा जाहीर केला. धुरंदर राजकीय नेते म्हणून नाना पटोले यांचा उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केला जातो. नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड होताच आपणास हायकमांडने पक्ष वाढीची जबाबदारी दिली आहे, ही बाब हेरून जर पक्ष वाढवायचा असेल, तर जुने काँग्रेसचे नेते जे पक्ष सोडून गेले, त्यांना परत पक्षामध आणण्याकरिता त्यांच्याशी थेट बोलणी सुरू केली आणि महाराष्ट्रातील पुढील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल, असे जाहीर केले. त्यामुळे अनेक काँग्रेस पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले खरे पण सत्तेत नाहीत, अशा नेत्यांची पाऊलं काँग्रेसच्या दरवाजाकडे वळू लागली आहेत. 

शनिवारी (ता. १९ जून) मुंबई येथे अमरावती येथील डॉ. सुनिल देशमुख यांच्यासह विदर्भातील अनेक बलाढ्य राजकीय शक्ती असणारे नेते काँग्रेसमध्ये परतणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दिग्रसचा माजी बलाढ्य नेता काँग्रेसमध्ये परतणार अशा चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नाना पटोले यांना ७५ ते ८० हजार मतदान घेणाऱ्या बलाढ्य नेत्याविषयी कळाल्याने त्यांच्यात काही चर्चेच्या फेऱ्या सुद्धा झाल्याचे दोन्ही बाजूचे समर्थक खुलेआम दिग्रस मध्ये सांगत सुटले आहेत. इतकेच नव्हे तर, कोणी समोर येऊन बेधडकपणे 'तो मी नव्हेच' असे सुद्धा स्पष्ट करत नाही. त्यामुळे दिग्रस विधानसभा मतदारसंघांमध्ये "भाऊंचा प्रवेश कधी?" अशी एकच चर्चा जोर धरत आहे. 

मुहूर्त टाळला ?

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजपची युती होणार नाही, ही बाब गृहीत धरून अनेकांनी आपापल्या सोयीनुसार पक्ष प्रवेश केला खरा, परंतु ऐन वेळेवर शिवसेना व भाजपची युती झाली आणि अनेक नेते तोंडघशी पडले. आता मात्र काँग्रेसने सुद्धा 'एकला चलो रे' चा नारा दिला खरा परंतु ऐन मोक्यावर कुणाशी युती झाली तर काय ? हा प्रश्न अनेकांना पडला तर नसेल ना ? आणि म्हणूनच अनेकांनी मुहूर्त तर टाळला नाही ना ? अशी शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com