काविळ झालेल्यांना सगळं पिवळंच दिसतं ! चाकणकरांचा अमृता फडणविसांना टोला - For those who are jaundiced, everything looks yellow, Chakankar's Amrita Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

काविळ झालेल्यांना सगळं पिवळंच दिसतं ! चाकणकरांचा अमृता फडणविसांना टोला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

राज्यात मद्यालये सुरू झाली. बार, रेस्टॉरेन्ट सुरू करता तर मग मंदिरे का नाही ? असा सवाल करीत गेल्या काही दिवसापासून भाजप राज्यात आंदोलन करीत आहे. 

मुंबई : मंदिर आणि मदिराबाबत अमृता फडणवीस महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला जो प्रश्‍न विचारत आहेत, तोच प्रश्‍न भाजपचे सरकार असलेल्या गोव्याच्या ठिकाणी जावूनही विचारू शकतात ! असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेत्या रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. 

कोरोनामुळे राज्यातील मंदिरांबरोबरच सर्वच धार्मिक स्थळ बंद आहेत. कोरोना, लॉकडाऊन, त्यानंतर टप्या टप्याने एक एक गोष्टी सुरू होत आहे. राज्यात मद्यालये सुरू झाली. बार, रेस्टॉरेन्ट सुरू करता तर मग मंदिरे का नाही ? असा सवाल करीत गेल्या काही दिवसापासून भाजप राज्यात आंदोलन करीत आहे. 

याच मुद्याकडे लक्ष वेधत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून हिंदुत्त्वाकडे लक्ष वेध राज्यातील मंदिरे का सुरू करीत नाही असा सवाल केला होता. सोबतच मुख्यमंत्र्यांना हिंदुत्त्वाची आठवणही करुन दिली. "बार-रेस्टॉरंट सुरु झाले, देवाचं कुलुप बंद का ? तुम्हाला हिंदुत्त्वाचा विसर पडला का ? मंदिरं सुरु करु नये असे दैवी संकेत मिळतात का ?" असे प्रश्‍न राज्यपालांनी या पत्रात उपस्थित केले होते. 

या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उत्तर दिलं आहे. माझ्या हिंदुत्त्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. मुंबईला पीओके म्हणणाऱ्याचं हसत-खेळत स्वागत करणं माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. तसेच प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल तुमच्या विनंतीचा सरकार जरुर विचार करेल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलं आहे.मुख्यमंत्र्यांनीही उत्तर देत हिंदुत्व मला चांगले कळते असे लिहिले. राज्यपालांच्या पत्रावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही ट्‌विट करून ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. 

त्यांनी म्हटले आहे, की "वाह प्रशासन' बार आणि दारूची दुकानं सताड उघडी असताना मंदिरं मात्र डेंजर झोन आहेत का? असमर्थ ठरल्यानंतर काही वेळा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी काही वेळा प्रमाणपत्र नक्कीच गरजेचं असतं ! असमर्थ ठरल्यानंतर काही वेळा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी काही वेळा प्रमाणपत्र नक्कीच गरजेचं असतं, असा टोला देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. 

अमृता फडणवीस यांनी केलेल्या टिकेचा समाचार चाकणकर यांनी घेतला आहे. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यात राज्यपाल एकच आहेत, मग दोन राज्यात वेगळी भूमिका का? मंदिर आणि मदीराबाबत हाच प्रश्न अमृता फडणवीस गोव्याच्या ठिकाणी विचारू शकतात का? महाविकास आघाडी सरकारने कोणताही निर्णय घेतला तर तो त्यांना वाईटच दिसतो. कावीळ झालेल्यांना सगळं पिवळं दिसतं. त्यांनी विचार करण्याचा अँगल बदलावा असा सल्लाही त्यांनी फडणवीस यांना दिला आहे. 

Edited By - Prakash Patil

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख