मुंबई : जुने संबंध तोडताना दुःख होणे स्वाभाविकच आहे, मात्र नवीन धागे विणतानाही शिसवसेनेच्या नेत्यांना अतिव दुःख झाले होते, हे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत बोलून दाखविले. भाजपशी नाते तोडताना व काॅंग्रेस-राष्ट्रवादीशी नव्याने घरोबा करताना मोठे दुःख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राऊत यांनी एका मुलाखतीत विविध प्रकरणांवर भाष्य केले. ते म्हणाले, ``शिवसेना आणि भाजप राजकारणात 25 वर्षे एकत्र होते. त्यामुळे भाजपसोबत आमचा भावनिक बंध तयार झाला होता. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला भाजपशी नाते तोडावे लागले. हे नाते केवळ राजकीय नसून भावनिक होते. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नवे घर थाटत असताना आम्हाला खूप दु:ख झाले होते.``
त्या वेळी फडणवीसांची उडविली खिल्ली
राऊत म्हणतात, की आम्हाला भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला त्यासाठी काही कारणे आहेत. ही युती फक्त राजकीय नव्हे, तर भावनिक होती. त्यामुळे ही युती तुटल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजपविषयीचा रोषही भावनिक होता. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांची शिवसेना कार्यकर्त्यांकडून “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन” अशा घोषणा देऊन खिल्ली उडवण्यात आली होती.
ठाकरे यांच्याबाबत विश्वास बसत नव्हता
राजकारण करताना कोणत्याही नेत्याचा अपमान होता कामा नये, हे माझे मत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेकांना विश्वास बसत नव्हता. उद्धव ठाकरे खरंच मुख्यमंत्री झाले आहेत का, हे लोकांना खरे वाटत नव्हते. आपण स्वप्नात तर नाही आहोत ना, हे तपासण्यासाठी लोक स्वत:लाच चिमटा काढून बघत होते, अशी कबुली राऊत यांनी दिली.
Edited By - Murlidhar Karale

