कर्करोग प्रतिबंधासाठी टाटाने रोड मॅप तयार करावा : राजेश टोपे यांची सूचना - Tata should prepare road map for cancer prevention: Rajesh Tope | Politics Marathi News - Sarkarnama

कर्करोग प्रतिबंधासाठी टाटाने रोड मॅप तयार करावा : राजेश टोपे यांची सूचना

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मार्च 2021

राज्यात कर्करोग प्रतिबंधासाठी टाटा रुग्णालयाने "रोड मॅप' तयार करावा. औरंगाबादमधील कर्करोग रुग्णालयावरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी जालना येथे टाटा रुग्णालयाचे क्षेत्रीय केंद्र (स्पोक) तयार करावे.

मुंबई : राज्यात कर्करोग प्रतिबंधासाठी टाटा रुग्णालयाने "रोड मॅप' तयार करावा. औरंगाबादमधील कर्करोग रुग्णालयावरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी जालना येथे टाटा रुग्णालयाचे क्षेत्रीय केंद्र (स्पोक) तयार करावे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

कर्करोग निदान केंद्र स्थापन करण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आरोग्यमंत्री टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. मुख, गर्भाशय, स्तनाचा कर्करोग याविषयी तपासणी, निदान, उपचाराची व्यवस्था या क्षेत्रीय केंद्रामध्ये करता येऊ शकते, असे टाटा रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी सांगितले.

हेही वाचा... सचिन वाझेंसोबत त्या दिवशी महिला कोण होती

औरंगाबाद येथे टाटा रुग्णालयाचे मोठे उपचार केंद्र (हब) आहे. तेथे उपचारासाठी रुग्णांची गर्दी असते. त्यासाठी प्रतीक्षा कालावधी मोठा असल्याने या हबवरील ताण कमी करण्यासाठी नजीकच्या जालना येथे टाटा रुग्णालयाचे क्षेत्रीय केंद्र (स्पोक) सुरू करण्याचा प्रस्ताव टाटा रुग्णालयामार्फत दिला आहे. त्याविषयी आजच्या बैठकीत चर्चा झाली. जालना येथे क्षेत्रीय केंद्र सुरू करण्यासाठी टाटा रुग्णालयातर्फे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देताना कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येईल.

कर्करुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या रोगाच्या प्रतिबंधासाठी आवश्‍यक पावले उचलली पाहिजेत. टाटा रुग्णालयाच्या संकल्पनेनुसार श्रेणी-2 अथवा तीन दर्जाचे क्षेत्रीय केंद्र जालना येथे तयार करावे. या क्षेत्रीय केंद्रामध्ये तपासणी, निदान, रेडिएशन, केमोथेरपीची सुविधा उपलब्ध असेल, असे टोपे यांनी सांगितले.

हेही वाचा... सुशांत खामकर, नव्हे सचिन वाझे

लठ्ठपणा आणि जीवनशैलीशी संबंधित आजारामुळे कर्करोगाचा धोका असल्याचे तज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिले. त्याविषयी समाजात जाणीवजागृती करण्यासाठी मोहीम हाती घेण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. कर्करोगाबाबत प्रत्येक जिल्ह्यात काय उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी मार्गदर्शन करण्याचे आवाहनही टोपे यांनी केले. या वेळी बार्शीतील कर्करोग रुग्णालयाबाबत चर्चा झाली. 
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख