मुंबई : बलात्कारासारखे गंभीर आरोप असलेल्या सामाजिक न्याय खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एफआयआर का नोंदवला जाऊ नये याचे समर्थन करणारी विधाने त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकडून केली जातात, यापेक्षा लाजीरवाणी परिस्थिती महाराष्ट्राने केव्हाही अनुभवली नव्हती, अशी खरमरीत टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
मुंडे यांचा राजीनामा न मागण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. त्यासंदर्भात भातखळकर यांनी समाजमाध्यमांवर व्हिडियो प्रसारित करून राष्ट्रवादी च्या भूमिकेचा समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी ने मुंडे यांना अभय देणे हा महाराष्ट्राच्या राजकारणातला बेशरमपणाचा परमोच्च बिंदू आहे, अशी जळजळीत टीकाही त्यांनी केली आहे.
कॅबिनेट मंत्र्यांवर बलात्कारासारखे गंभीर गुन्हे असतानाही 72 तासांनंतरही साधा एफआयआर देखील नोंदविला जात नाही. किंबहुना एफआयआर का नोंदवला जाऊ नये याचे समर्थन करणारी विधाने राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केली जात आहेत. यापेक्षा लाजीरवाणी परिस्थिती महाराष्ट्राने कधी अनुभवली नव्हती, अशी टीकाही भातखळकर यांनी केली आहे.
हा सर्व प्रकार महाराष्ट्राची जनता शांतपणे पहात बसेल असा कोणाचा समज असेल तर त्या गैरसमजातून बाहेर पडावे. या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरून त्या मंत्र्याविरुद्ध आंदोलन उभे करेल व राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.
Edited By - Murlidhar Karale

