महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव - Proposal of infringement against Mayor Kishori Pednekar | Politics Marathi News - Sarkarnama

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना हक्कभंगाच्या प्रस्तावाबाबत पत्र दिले आहे. 27 मुद्यांवरुन महापौरांच्या कामकाजावर आक्षेप नोंदवत हा हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

मुंबई : कोविड प्रतिबंधासाठी झालेला भ्रष्टाचार कोविड संक्रमण हाताळण्यात आलेले अपयश त्याचबरोबर शहरातील बेकायदा बांधकाम आणि पावसाळ्यात ओढावलेली पुर परिस्थिती अशा विविध मुद्दयांवर महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडणार आहे. कोविडच्या नावाखाली "भोजनसे कफन तक' असा जंम्बो भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा भाजपने केला आहे. याबाबत अद्याप कॉंग्रेसकडून भुमिका घेण्यात आलेली नसली, तरी या हक्कभंगाच्या प्रस्तावर चर्चा होण्याची गरज असल्याचे कॉॅंग्रेसकडून सांगण्यात आले.

भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना हक्कभंगाच्या प्रस्तावाबाबत पत्र दिले आहे. 27 मुद्यांवरुन महापौरांच्या कामकाजावर आक्षेप नोंदवत हा हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यात प्रामुख्याने कोविड साथीसाठी करण्यात आलेल्या कामातील भ्रष्टाचारा बरोबरच पीएमकेअर फंडमधून आलेले 800 हून अधिक व्हेंटीलेटर न वापरणे त्याचबरोबर मुंबईतील बेकायदा बांधकामाचा मुद्दा समाविष्ट आहे.

अभिनेत्री कंगणा राणवत हिच्या बंगल्यावर महानगर पालिकेने कारवाई केल्यानंतर रोज बेकायदा बांधकामाबाबत तक्रारी देऊ, असा इशारा भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिला होता. भाजपकडून या हक्कभंगाच्या प्रस्तावाची तयारी सुरु होती. मात्र, बुधवारी झालेल्या कारवाई नंतर आज या हक्कभंगाच्या प्रस्तावाचे पत्र महापौरांना देण्यात आले. "मार्च पासून कोविडच्या साथी हाताळण्यास महापालिकेला अपयश आले आहे. रुग्णांबरोबरच मृत्यूदरही वाढतोय.प्रशासन निष्क्रीय असून, सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेना उदासिन आहे. कोविडच्या नावाखाली केवळ भ्रष्टाचार झाला असून, लोकप्रतिनिधींना चर्चा करण्यासाठी कोणतेही व्यासपिठ उपलब्ध झालेले नाही. यासाठी महापौर जबाबदार असल्याने त्यांच्या विरोधात अविश्‍वासचा ठराव मांडण्यात आला आहे.

कॉंग्रेसने अद्याप अविश्‍वास ठरावाबाबत कोणतीही भुमिका घेतलेली नाही. आम्ही पालिकेत विरोधी पक्षात आहोत. अविश्‍वास ठरावाबाबत पक्षात चर्चा करुन निर्णय घेऊ. मात्र, या ठरावावर चर्चा होणे गरजेचे आहे, असे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले. कॉंग्रेसच्या या भुमिकेमुळे हक्कभंगाच्या प्रस्तावाची उत्सुकता अधिक वाढलेली आहे.

28 सप्टेंबरला होणार महासभा

कोविडमुळे मार्च महिन्यापासून फक्त एकदाच पालिकेच्या महासभेचे कामकाज झाले. त्यावेळी फक्त अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधातील हक्कभंगाच्या प्रस्तावाचे पत्र आज महापौर कार्यालयात भाजपने दिले. त्यानंतर 28 ते 30 सप्टेंबर या काळात महासभा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

काय असतं हक्कभंग

महापौरांबरोबरच पालिका आयुक्तांविरोधातही हक्कभंग आणला जातो. यात सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यांना बहुमताने हा हक्कभंग मंजूर करावा लागतो. म्हणजे पालिकेत सध्या 222 सदस्य आहेत. ते सर्व महासभेत उपस्थित असलेल्या हक्कभंगाच्या बाजूने 112 सदस्यांनी मतदान करणे गरजेचे आहे. मात्र,त्यानंतरही आपले पद सोडावे का नाही, हा निर्णय महापौरांचा असतो.

यापूर्वी अनेक वेळा महापौरांविरोधात हक्कभंग आणण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला. काही वेळा हा प्रस्ताव सादर केला नाही, तर काही वेळा प्रस्ताव मागे घेण्यात आले. मात्र, हक्कभंगाच्या प्रस्तावावर गेल्या 3 दशकातही एकदाही मतदान झालेले नाही.

पालिकेतील संख्याबळ
- शिवसेना - 94 (अपक्षांसह )
- भाजप - 83 (अभासे आणि अपक्षांसह)
- कॉंग्रेस - 28
- राष्ट्रवादी कॉंग्रेस - 8
- समाजवादी पक्षा - 6
- एमआयएम - 2
- मनसे 1

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख