लोकप्रतिनिधी खरेदी करणाऱ्या उद्योगपतींसाठी नवे कृषी कायदे - New agricultural laws for industrialists who buy people's representatives | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

लोकप्रतिनिधी खरेदी करणाऱ्या उद्योगपतींसाठी नवे कृषी कायदे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून शेतकरी विरोधी भूमिका घेत आले आहेत. बिहारमध्ये २००६ मध्ये हा कायदा लागू केला होता, तेथे तो अपयशी ठरलेला असतानाही फक्त उद्योगपतींच्या हितासाठी तो भारतभर लागू करण्याचा त्यांचा डाव आहे.

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने आणलेले तीन कृषी कायदे हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्राला मोडीत काढणारे आहेत. हे कायदे शेतकऱ्यांसाठी नसून विरोधी पक्षांचे आमदार खासदार खरेदी करण्यास मदत करणाऱ्या उद्योपतींसाठी आणले आहेत. हे काळे कायदे रद्द करण्यास काँग्रेस पक्ष मोदी सरकारला भाग पाडेल, अशी ग्वाही पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.

काँग्रेसने आयोजित केलेल्या शेतकरी बचाव या महाव्हर्च्युअल रॅलीला ते संगमनेर येथून संबोधित करत होते. काँग्रेसने आज राज्याच्या सहा विभागातून ही व्हर्च्युअल रॅली आयोजित केली होती. संगमनेरच्या मुख्य कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, खासदार राजव सातव यांनी काळ्या कायद्याविरोधात मोदी सरकारवर तोफ डागली.

एच. के. पाटील पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून शेतकरी विरोधी भूमिका घेत आले आहेत. बिहारमध्ये २००६ मध्ये हा कायदा लागू केला होता, तेथे तो अपयशी ठरलेला असतानाही फक्त उद्योगपतींच्या हितासाठी तो भारतभर लागू करण्याचा त्यांचा डाव आहे.  

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, केंद्र सरकारने आणलेले हे कायदे कामगार शेतकऱ्यांच्या हितासाठी नाहीत. काँग्रेसने उभे केलेली बाजार समिती व्यवस्था संपुष्टात आणून साठेबाजी, काळा बाजार करणाऱ्यांना मोकळे रान मिळणार आहे. काँग्रसने शेतकरी, कामगार यांच्यासाठी हक्काचे कायदे केले होते. ते कायदे रद्द करून त्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचे काम सुरु झाले आहे. या कायद्यांविरोधात शेतकरी, कामगारांच्या हितासाठी हा एल्गार सुरु केला असून न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरुच ठेवू.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे, त्या शेतकऱ्याबद्दल विद्यमान सरकारची काय भूमिका आहे, ते काळ्या कायद्यातून दिसून आले. मोदी सरकार शेतकरी उद्धवस्त करण्याच्या मार्गावर आहे. नव्याने जमीनदारी आणण्याचा त्यांचा डाव असून, हा डाव हाणून पाडला पाहिजे. आज सुरु केलेला हा जागर महाराष्ट्रभर सुरु करून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल. 

या रॅलीला औरंगाबाद येथून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, काँग्रेस कार्याध्यक्ष बस्वराज पाटील यांनी, तर कोल्हापूर येथून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, सतेज बंटी पाटील यांनी संबोधित केले. अमरावती येथून महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी, तर नागपूर येथून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी संबोधित केले. कोकण विभागात काँग्रेस कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी रॅलीला संबोधीत केले. संगमनेर येथील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी केले.

Edited By - Murildhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख