मुंबई : महाविकास आघाडी जिल्हा गाव पातळीवर एकजीव होईल काय, या शंकेला राजकारणात बड्या मानल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्याने उत्तर दिले असून, स्थायी समितीच्या निवडणुकीत मिळून मिसळून समीकरणे तयार झाली आहेत. आमदार संग्राम जगताप यांचे वर्चस्व कायम राखणाऱ्या या समिकरणाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तसेच मंत्री शंकरराव गडाख आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचे आभार मानले आहेत.
तोडगा काढण्यासाठी या चारही जणांनी जी मदत केली, त्यामुळे उमेदवारी परस्परांच्या समर्थनार्थ मागे घेणे सोपे झाले आहे. पारनेर नगरपालिकेतील वादातही राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्रपणे तोडगा काढण्यासाठी सरसावले होते. नगर जिल्हयातील शक्ती वाढवण्यासाठी शंकरराव गडाख यांना उद्धव ठाकरे यांचे खास मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेनेत आणले आहे. आज संग्राम जगताप यांनी गडाख यांचे आभार मानतानाच सेनेचे भाउ कोरगावकर यांनी दिलेल्या सहकार्याचाही उल्लेख केला आहे.
नगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडीत शिवसेनेचे उमेदवार योगीराज गाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार मनोज कोतकर यांची बिनविरोध निवड झाली. या सर्व घडामोडीत आमदार जगताप यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहे.
Edited By - Murlidhar Karale

