नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान ट्रॅक्टर रॅलीसाठी पोलिसांनी ठरवून दिलेला मार्ग सोडून शेतकऱ्यांनी थेट लाल किल्ल्यावर चाल केली आहे. पोलिसांचा विरोध झुगारून शेतकऱ्यांनी लाल किल्ला परिसरात कब्जा केला आहे. त्यामुळे पोलिसही हतबल झाले आहेत. काही ठिकाणी लाठिचार्ज झाला, तर अनेक ठिकाणी धुराचे नळकांडे फोडण्यात आले आहेत. दरम्यान, याबाबत दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची गृह सचिवांनी तातडीने बैठक बोलावली असून, परिस्थितीला सामोरे जाण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
हे आंदोलन शांततेने होण्याबाबत शेतकरी नेत्यांनी आवाहन केले होते. तथापि, या आंदोलनाला हिंसक स्वरूप आले आहे. देशभरातून आलेल्या लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीत ठाण मांडले आले. आज ट्रॅक्टर रॅलीमुळे संपूर्ण शहर दणाणून सोडले आहे. आंदोलनाचा भाग म्हणून ट्रॅक्टर रॅलीसाठी मार्ग ठरवून दिला होता, मात्र अनेक ठिकाणी पोलिस व शेतकरी आमने-सामने आले असून, हे मार्ग तोडण्यात आले आहेत. लाल किल्ला परिसरात शेतकऱ्यांना येण्यास बंदी केली असतानाही शेतकऱ्यांनी सर्व बॅरिकेट तोडून लाल किल्ल्याजवळील परिसर ताब्यात घेतला. पोलिसांना न जुमानता शेतकरी या परिसरता आले. पोलिसांनी त्यावेळी पोलिस बळाचा वापर केला, तथापि, शेतकऱ्यांनी आक्रम पवित्रा घेतला.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रासह इतर सर्वच राज्यांमध्ये ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे.
नेत्यांची तातडीची बैठक
दरम्यान, आंदोलनाला अधिक हिंसक स्वरुप येऊ नये, यासाठी नेत्यांची तातडीने बैठक दिल्ली येथे आयोजित केली आहे. गृह सचिवांनी ही बैठक बोलावली असून, आंदोलन शांततेच्या मार्गाने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शेतकरी नेत्यांनीही आवाहन केले आहे. तथापि, हिंसक परिस्थिती ही शेतकऱ्यांनी केली नसून, त्यामध्ये काही इतर लोकांनी केली असावी, असा पवित्रा शेतकरी नेते घेत आहेत. शेतकरी शांततेच्या मार्गानेच आंदोलन करीत आहेत. इतर काही घुसखोरांनी गुंडागर्दी केली असल्याचा आरोप काही शेतकरी नेते करीत आहेत.
Edited By - Murlidhar Karale

