तुमचा सात-बारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव : थोरात

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने आंदोलन पुकारले होते.
balasaheb thorat.jpg
balasaheb thorat.jpg

मुंबई : मोदी सरकारने कामगार व शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला असून, आता तुमचा सातबारा (७/१२) भांडवलदारांच्या नावावर करण्याचा डाव रचला आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसलूमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील इतर पक्षांनीही पाठिंबा दिला. आजच्या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, शेकापचे जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते, माजी मंत्री नसीम खान, भाई जगताप, समाजवादी पक्षाचे अबु आझमी, डाव्या पक्षांचे नेते अशोक ढवळे तसेच विविध नेते उपस्थित होते.

थोरात म्हणाले, की केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत दोन महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन इतिहास घडवणारे आहे. या कायद्याविरोधात पंजाब हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर कडाक्याच्या थंडीत मोदी सरकारने शेतकऱ्यांवर थंड पाण्याचा मारा केला, तरीही शेतकरी मागे हटला नाही. आझाद मैदानातील हा एल्गार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची ताकद वाढवणारा ठरणार असून, तो देशाला दिशा देणारा ठरणार आहे.

मोदी सरकारने कोणाशीही चर्चा न करता पाशवी बहुमताच्या आधारावर हे कायदे मंजूर करुन घेतले. संसदेत चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या खासदारांना  निलंबत करून कायदे मंजूर करुन घेतले. या कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये आक्रोश असून, देशाच्या विविध भागातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. या कायद्यात आधारभूत किंमत नाही. बाजार समित्या नष्ट होणार आहेत, रेशन दुकानेही संपुष्टात येणार आहेत. हे कायदे फक्त भांडवलदार, साठेबाज, नफेखोरांसाठी आहेत ते रद्द झालेच पाहिजे ही आमची मागणी आहे.

भाजपा सरकारने आणलेल्या काळ्या कायद्यांना काँग्रेसने सुरुवातीपासूनच विविध आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र विरोध दर्शवलेला आहे. महाराष्ट्रातही ट्रॅक्टर रॅली, किसान महाव्हर्च्युअल रॅली, आंदोलने, मोर्चा, राजभवनला घेराव घातला. देशभरातून दोन कोटी शेतकरी, शेतमजूरांच्या सह्यांचे निवेदनही राष्ट्रपतींना देण्यात आले. काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा असून, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध आहे, त्यासंदर्भात चर्चा सुरु असून, लवकरच कायदा केला जाणार आहे, असेही थोरात म्हणाले.
 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com