`त्या` टोळीकडे एमआयएमच्या दोघा आमदारांचे लेटरहेड, त्यांना अटक करा - Letterheads of two MIM MLAs to 'that' gang, they should be arrested | Politics Marathi News - Sarkarnama

`त्या` टोळीकडे एमआयएमच्या दोघा आमदारांचे लेटरहेड, त्यांना अटक करा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

बांग्लादेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळवून देणाऱ्या टोळीकडे एमआयएमच्या दोघा आमदारांची लेटरहेड मिळाल्याने त्यांना अटक करण्यात यावी.

मुंबई : बांग्लादेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळवून देणाऱ्या टोळीकडे एमआयएमच्या दोघा आमदारांची लेटरहेड मिळाल्याने त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

बांग्लादेशी नागरिकांना बेकायदेशीररित्या भारताचे नागरिकत्व मिळवून देणाऱ्या एक टोळीला आज मुंबई पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून महाराष्ट्रातील एमआयएमच्या दोन आमदारांची सही असलेली लेटरहेड जप्त केली आहेत. त्यामुळे कायमच बेकायदा कृत्ये करणाऱ्या या पक्षाचा देशद्रोही चेहरा पुन्हा एकदा सर्वांसमोर आला असल्याची टीकाही भातखळकर यांनी केली आहे. 

बांग्लादेशी घुसखोरांना भारतीय नागरिकत्व देण्याच्या या कटात आमदार मुफ्ती मुहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि आमदार शेख आसिफ शेख रशीद यांचाही हात असेल, तर त्यांना तात्काळ अटक करा, अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.

मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी आज वरीलप्रमाणे रॅकेट चालविणाऱ्या टोळीला अटक केली. या टोळीने एमआयएमचे आमदार मुफ्ती मुहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि आमदार शेख आसिफ शेख रशीद यांच्या लेटर हेडचा वापर करून मुंबईसह, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबादसह भारतातील विविध शहरांमध्ये बांग्लादेशींना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्याकरिता बनावट सरकारी दस्तावेज तयार केल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे एमआयएमच्या या आमदारांची कोरी लेटरहेड सुद्धा मिळाली आहेत. हा अतिशय घातक व धोकादायक प्रकार असून, भारताचा बांग्लादेश बनवण्याचा प्रयत्न आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) द्यावा अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.

वंदे मातरमला विरोध, काश्मीरचे कलम 370 हटवण्याला विरोध, नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध, एन. आर. सी. ला विरोध असे उपद्व्याप असादुद्दीन ओवैसी व त्यांचा पक्ष नेहमीच करतो. आता त्यांच्या पक्षाने आपले मतदार वाढविण्यासाठी बांग्लादेशींना बेकायदेशीररित्या भारताचे नागरिकत्व देण्याची मोहीम हाती घेतली आहे काय ? असा प्रश्नही भातखळकर यांनी केला आहे.

बोगस लेटरहेड बनवल्याचा संशय

या टोळीने जशी आधारकार्ड व अन्य बोगस कागदपत्रे बनविली, तशीच त्यांनी माझी लेडरहेड देखील बोगस बनविली असावीत, असा मला संशय आहे. मी माझी कोरी लेटरहेड कोणालाही दिली नाहीत, मी जेव्हा कोणाला लेटरहेडवर पत्र देतो, तेव्हा त्याची साक्षांकित प्रत नोंद म्हणून माझ्याजवळ ठेवतो. याप्रकरणात पोलिसांनी दोषींवर जरूर कठोर कारवाई करावी. 
- मौलाना मुफ्ती मोहमद इस्माईल, आमदार, एमआयएम, मालेगाव
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख