मुंबई : कंगना राणावतने मुंबईसंदर्भात केलेल्या तिच्या ट्विटवरून मोठा वाद निर्माण झाला. मुंबईसह महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी तिच्याबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली. तसेच बॉलीवूडमधील अनेकांनी तिच्यावर टीका केली. त्यामुळे आता कंगनाचा सूर नरमला आहे आणि तिने आता "जय मुंबई, जय महाराष्ट्र' नावाचे एक नवे ट्विट केले आहे.
कंगनाने तिच्या नवीन ट्विटमध्ये तिचे समर्थन करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत. ती म्हणते की, "महाराष्ट्रासह देशभरातील सर्व मित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्या उद्देशाबद्दल कोणालाही शंका नाही आणि मला माझ्या कामाचे ठिकाण म्हणजे मुंबईवर माझे प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही. मी नेहमी मुंबईला "यशोदा मॉं'चा दर्जा दिला आहे. जय मुंबई, जय महाराष्ट्र!'
बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने महाराष्ट्रातील अनेक सेलिब्रिटींनी आणि नेत्यांनी तिला लक्ष्य केले होते. अनेक कलाकारांनी कंगनाच्या भूमिकेला विरोध दर्शविला होता. शिवसेना आणि मनसेनेही कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला. तसेच तिला मुंबई आणि महाराष्ट्रात न थांबण्याचा सल्ला दिला होता. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही मुंबई पोलिसांवर विश्वास नाही त्यांना मुंबई व महाराष्ट्रात राहण्याचा हक्क नाही, असे म्हटले होते. त्यामुळे कंगना आता नरमली असून, तिने मुंबई ही माझी "यशोदा माता' आहे, असे म्हटले आहे.
Edited By - Murlidhar Karale

