एसईबीसी पर्याय वगळून मराठा आरक्षण संपविण्याचा डाव - Intrigue to end Maratha reservation without SEBC option | Politics Marathi News - Sarkarnama

एसईबीसी पर्याय वगळून मराठा आरक्षण संपविण्याचा डाव

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार मराठा समाजाच्या विद्यार्थांनी एसईबीसी गटात अर्ज केले होते. मात्र आता प्रवर्ग बदलण्याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत कोणतीही सूचना न आल्यामुळे मराठा विद्यार्थी संभ्रमात आहेत.

मुंबई : एमपीएससी परिक्षांमध्ये मराठा समाजाचे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण काढून त्यांना खुल्या किंवा इडब्ल्यूएस प्रवर्गात बदलण्यास सांगितले आहे. मात्र त्यासंदर्भात शुक्रवार शेवटचा दिवस असूनही कसलीही सूचना न दिल्याने हा मराठा आरक्षण संपवण्याचा डाव असल्याची शंका येत असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.  

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार मराठा समाजाच्या विद्यार्थांनी एसईबीसी गटात अर्ज केले होते. मात्र आता प्रवर्ग बदलण्याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत कोणतीही सूचना न आल्यामुळे मराठा विद्यार्थी संभ्रमात आहेत. हा संभ्रम संपविण्यासाठी सरकारनेच सूचना देण्याची गरज आहे. एकतर सध्या मराठा आरक्षणावरून राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरणही तापले आहे. मराठा नेत्यांनी अनेक निवेदने दिली, सरकारशी चर्चाही केल्या. मात्र अद्याप निर्णय होत नसल्याने मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही, असा आरोपही दरेकर यांनी केला. 
 
एकीकडे सर्वोच्च न्यायालयात 25 जानेवारी रोजी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेल असे सरकार म्हणते. तर दुसरीकडे आयोगाच्या परिक्षेमधुन मराठा विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण नाकारते, यामुळे मराठा समाजात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. ईडब्ल्यूएस मध्ये तेरा टक्के जागा मिळणार का ? वयोमर्यादा शिथिल होणार का ? जर परीक्षा मार्च व एप्रिल मध्ये होणार आहेत तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या घोषणपत्रात 15 जानेवारीची मुदत का ? विद्यार्थ्यांना अडचणीत आणण्यासाठी आणि आरक्षण संपवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे का ? असे प्रश्नही दरेकर यांनी उपस्थित केले.
 
मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकवण्यासाठी हे सरकार आता काहीही करणार नाही अशी धारणा आता मराठा समाजामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरच याबाबत एक शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी अचूक मार्ग अवलंबण्याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती करणार आहे, असे दरेकर यांनी सांगितले.
 

 

Edited By - Murlidhar karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख