नवी दिल्ली : भारत चीनबरोबरच्या सीमावादावर शांततापूर्ण तोडगा काढू इच्छितो. मात्र 1993 व 1996 मधील करारांचे उल्लंघन करणाऱ्या चीनची उक्ती व कृती परस्परविरोधी आहे व भारत प्रत्यक्ष ताबारेषेवरील (एलएसी) आपल्या सीमेच्या रक्षणाबाबत व देशाच्या अखंडतेबाबत कोणतीही तडजोड करू शकत नाही, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी राज्यसभेत देशाची भूमिका स्पष्ट केली.
चीनने भारतीय सैन्याला या भागात गस्त घालण्यास अडथळे आणले आहेत का, या माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्या प्रश्नावर राजनाथसिंह यांनी, "भारतीय लष्कराला आपल्या हद्दीत गस्त घालण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही,' असा निर्धार व्यक्त केला.
राजनाथसिंह यांनी भारत चीन संबंध व लडाखमधील तणावग्रस्त, स्फोटक परिस्तितीबाबत केलेल्या निवेदनानंतर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, अँटनी, आनंद शर्मा, वीरेंद्रकुमार वैश्य, प्रसन्न आचार्य, संजय राऊत आदी पक्षनेत्यांनी प्रश्न विचारले. चीनबरोबरच्या वादात देशाची संसद सरकारच्या मागे भक्कमपणे उभी असल्याचे बहुतांश नेत्यांनी सांगितले. त्याबरोबरच सीमेवर एप्रिलमध्ये म्हणजे गलवान संघर्षापूर्वी चिनी सैनिक जेथे होते तेथे त्यांनी परत गेले पाहिजे यासाठी भारताने आग्रही व ठाम रहावे आणि कोणतीही तडजोड करू नये, असेही विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.
चीनवर विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती नसल्याने भारतीय जवान क्षणोक्षणी सीमेवर सजग आहेत, असे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. राजनाथसिंह म्हणाले, की आम्ही राजनैतिक चर्चेच्या माध्यमातून शेजारी देशाला बजावले आहे, की सीमेवरील यथास्थिती (स्टेटस को) बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न भारताला कदापी मान्य नाही.
राजनाथसिंह यांनी निवेदनाच्या सुरवातीला मास्क काढून ठेवला होता. सभापती वेंकय्या नायडू यांनी त्यांना, मास्क वापरा असे बजावल्यावर त्यांनी मास्क लावला. नायडू यांनी राजनाथसिंह यांना, चीन मुद्यावर सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करा व त्यांचे शंकानिरसन करा, यात अधिकाऱ्यांनाही सहभागी करून घ्या, अशी सूचना केली.
वसुधैवकुटुंकम ही भारताची हजारो वर्षांची संस्कृती आहे, हे साऱ्या जगाने मान्य केल्याने या वादात जग कोणावर विश्वास ठेवत आहे, हे स्पष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले. मात्र पूर्वसूचना न देता ऐनवेळी प्रश्न विचारणारांची संख्या वाढत गेल्यावर नायडू यांनी "हे अत्यंत वेदनादायक आहे' असे नमूद केले.
राजनाथसिंह म्हणाले :
- द्विपक्षीय चर्चा एकीकडे सुरू होती, त्याच वेळी चीनने सीमेवरील परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न केले, जे आमच्या सैन्याने हाणून पाडले.
- आम्ही पूर्व लडाखमध्ये एका आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत आहोत. प्रत्येक मुद्दायावर भारत सांततापूर्ण व चर्चेद्वारेच तोडगा काढू इच्छितो. मात्र देशाची अखंडता व एकता कायम ठेवण्याबाबत आम्ही पूर्णतः ठाम आहोत.
- आमचे शूर जवान कोणत्याही आव्हानाला परतवून लावण्यास समर्थ आहेत.
- चीनने पेंगॉंग भागात मोठ्या संख्येने शस्त्रास्त्रे, दारूगोळा जमविला आहे. भारतानेही प्रत्युत्तर म्हणून लष्करी जमवाजमव केली आहे.
- भारत-चीन सीमा प्रश्न अतिशय जटील मुद्दा आहे व त्याबाबत संयमाने पुढे जाण्याची गरज आहे, यावर दोन्ही देशांनी औपचारीकपणे सहमती व्यक्त केली. या मुद्यावर एक व्याहारिक, दोघांनाही मान्य होईल, असा तोडगा चर्चेद्वारे काढला जावा, ही भारताची भूमिका आहे.
- सीमेबाबतची परिस्थिती एकतर्फीपणे बदलण्याचे प्रयत्न भारताला मंजूर नाहीत व तसे झाले तर ते हाणून पाडले जातील, हा संदेश आम्ही राजनैतिक व लष्कराच्या पातलीवरून चीनकडे पोहोचविला आहे.
- युध्दाची सुरवात कोणाच्या हाती असते, पण त्याचा शेवट मात्र कोणाच्याही हाती नसतो. ज्या भारताने साऱ्या जगाला शांततेचा संदेश दिला, त्या भारतीय भूमीच्या शांततेत विघ्न आणण्याचे प्रयत्न केले जातात.
- मॉस्कोमध्ये चीनचे संरक्षणमंत्री र्वे फेंगहे यांच्याशी चर्चेत मी हे स्पष्ट केले, की भारत कोणत्याही मुद्यावर शांततेने तोडगा काढू इच्छितो, पण आमच्या देशाच्या अखंडतेसाठी आम्ही संपूर्णपणे कटिबध्द आहोत.
- एलएसीचा सन्मान करणे व त्याचे कटाक्षाने पालन करणे हाच सीमाभागांतील शांती व सद्भावनेचा आधार आहे व भारत त्याचे आवर्जून पालन करत आला आहे. 1993 -1996 च्या भारत चीन करारात हेच स्पष्ट केले आहे. मात्र चीनकडून तसे होत नाही.
- चीनने भारताची सुमारे 38000 स्वेअर किलोमीटर जमिन अनधिकृतरीत्या बळकावली आहे व पाकिस्तानने 1963 मध्ये एका कथित करारानुसार पाकव्याप्त काश्मीरमधील 5180 स्वे. किलोमीटर जमीन अवैधपणे चीनला दिली आहे.
Edited By - Murlidhar Karale