अण्णासाहेब शिंदे असते, तर शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती : शरद पवार - If it was Annasaheb Shinde, this time would not have come for the farmers: Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

अण्णासाहेब शिंदे असते, तर शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती : शरद पवार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 28 जानेवारी 2021

देशाच्या कृषी क्षेत्राला प्रचंड मोठं योगदान देणाऱ्या आणि सहकारी चळवळीला दिशा देणाऱ्या अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने संबंध वर्षामध्ये विविध विषयांवर विविध चर्चासत्रे चालवावीत.

मुंबई : आज शेतकरी संघटनांना थंडीमध्ये ६० दिवस आंदोलन करण्याची वेळ आली. जर अण्णासाहेब शिंदे या कालखंडात असते, तर शेतकऱ्यांवर अशी वेळ आली नसती,. कारण त्यांची संवेदना शेतीशी आणि शेतकऱ्यांशी निगडित अशा प्रकारची होती. आजचे राज्यकर्ते त्यांच्याकडून काही शिकतील आणि त्या दृष्टीने या प्रश्नाकडे बघतील, अशा प्रकारची अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो, असे मत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने मुंबईत कार्यक्रम झाला. या वेळी पवार बोलत होते.

ते म्हणाले, की देशाच्या कृषी क्षेत्राला प्रचंड मोठं योगदान देणाऱ्या आणि सहकारी चळवळीला दिशा देणाऱ्या अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने संबंध वर्षामध्ये विविध विषयांवर विविध चर्चासत्रे चालवावीत, अशी संकल्पना घेऊन आम्ही आज त्याची सुरुवात करीत आहोत.

अण्णासाहेब शिंदे आणि चव्हाण प्रतिष्ठानचा घनिष्ठ संबंध आहे. संस्थापकांच्या यादीमध्ये आपल्याला त्यांचं नाव पहायला मिळेल. सुरुवातीच्या काळात संस्थेचे अध्यक्ष म्हणून काहीकाळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि विवध प्रकारच्या बैठकांना नेतृत्व देण्याचं काम त्यांनी केलं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अण्णासाहेब शिंदे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

यशवंतराव चव्हाणांना अण्णासाहेबांबद्दल आस्था होती. म्हणूनच त्यांनी अण्णासाहेबांना १९६२ साली नगर जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली व विजयी झाल्यानंतर जवाहरलाल नेहरूंना आग्रहाने सांगून कृषी खात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून जबाबदारी सुपूर्द केली. अनेक वर्षे शेती विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा व दृष्टीचा ठसा उमटवला.

संशोधनाच्या क्षेत्रावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केलं. या क्षेत्रातल्या मान्यवरांना सहभागी करून घेतलं. देशामध्ये हरितक्रांती आणण्यात ज्या लोकांचं योगदान होत त्यात बाबू जगजीवनराम, सी. सुब्रमण्यम यांच्या जोडीने अण्णासाहेब शिंदेंचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. हरितक्रांती प्रत्यक्षात आणण्याच्या उपक्रमात अखंडता आणि सातत्य अण्णासाहेबांमुळेच शक्य झालं.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख