जम्बो हाॅस्पिटलचा फायदा ठेकेदारांना किती झाला? देवेंद्र फडणवीसांचा सवाल - How much did the contractors of Jumbo Hospital get? Question by Devendra Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

जम्बो हाॅस्पिटलचा फायदा ठेकेदारांना किती झाला? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मार्च 2021

कोरोनाच्या काळात जम्बो हाॅस्पिटलचा किती लोकांना लाभ झाला, पेशंटला नव्हे, कंत्राटदारांना किती लाभ झाला, याचाही लेखाजोखा मांडला असता, तर बरे झाले असते.

मुंबई ः कोरोनाच्या काळात जम्बो हाॅस्पिटलचा किती लोकांना लाभ झाला, पेशंटला नव्हे, कंत्राटदारांना किती लाभ झाला, याचाही लेखाजोखा मांडला असता, तर बरे झाले असते. आमचे मंत्रीमहोदय महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतून लाभ दिला असे सांगतात, त्यापेक्षा 10 टक्के सुद्धा लोकांना लाभ झाला नसल्याचे दिसून आले, असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले, की देशात एकूण मृत्यू एक लाखाच्यावर आहेत. महाराष्ट्रातील मृत्यू 52 हजार आहेत. देशाच्या 31 टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत. आपण चाचण्याच कमी करतो. चाचण्यांची संख्या कमी करीत आणली, तरीही संक्रमणाची परिस्थिती आश्चर्यचकित करणारी आहे. अमरावतीमध्ये पाॅझिटिव्हचे रॅकेट बाहेर आले. ही रुग्णसंख्या खरोखर वाढली, की त्यामागे काही वेगळेच आहे, हे पाहणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा.. रस्त्यांसाठी निधी कोटी मंजूर

प्रेताच्या टाळुवरील लोणी खाण्याचा हा प्रकार

फडणवीस म्हणाले, की  अमरावतीमध्ये कशाच्या भरवाशावर लाॅकडाऊन केले. त्या काळात व्यवस्था नव्हत्या. ज्याच्या मनात आले, ते लाॅकडाऊन करून टाकतात. लाॅकडाऊन करताय, तर तेथे टपरीवाले, चहावाले यांना मदत करणार काय. कोविडमध्ये मोठा भ्रष्ट्राचार चालला आहे. कोविड हाताळण्यात महाराष्ट्रात काय अवस्था आहे. महाराष्ट्रातील जम्बो कोविड सेंटरच्या बाबतीत अनेकजण चरले. त्यात रुग्ण किती गेले, किती खर्च झाला, हे पहा.कोविडच्या नावाने मनमानी कारभार झाला, तो समोर आल्यानंतर प्रेताच्या टाळुवरील लोणी खाणे असेच म्हणावे लागेल.

कंपाउंडरला डाॅक्टरची जबाबदारी देण्याचा प्रकार

कोविडच्या काळात माहितीचे डाॅक्युमेंटेशन करायचे, पण कोणी करायचे. आपल्याकडे याचे डाॅक्युमेंटेशन रस्ते महामंडळ करते. आगामी काळात प्रभावी नियंत्रणात करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळ यांच्याकडे सोपविण्यात आली. म्हणजे कंपाउंडरला डाॅक्टरची जबाबदारी देणे असेच झाले. तुमच्याकडे आरोग्य विभाग नाही का. या ऐवजी रस्ते महामंडळाकडे हे काम कसे दिले. त्यांनीही कुठल्या तरी कंपनीकडे दिले. त्या कंपनीचा आरोग्यात काही अनुभव आहे का, हा काय खेळखंडोबा चालला आहे, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.

सरकारमध्ये केवळ फेसबूकलाईव्ह सुरू

यवतमाळमध्ये 12 बालकांना पोलिओच्या ऐवजी सॅनिकायझर पाजण्यात आले. त्यात दोषी कोण, तर नर्स, अंगणवाडी सेविका. म्हणजेच कोणावरही काहीही कारवाई होत नाही. सरकारमध्ये केवळ फेसबूक लाईव्ह चालू आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतो का, महाराष्ट्रातील जनतेचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचतच नाही. महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यात डाॅक्टरांची वाणवा आहे. भरती करायचे सांगितले, परंतु त्यात काहीही होऊ शकले नाही. प्रति दहा हजार लोकसंख्येमागे दहा हजारामागे केवळ 18 आहेत. त्यातही आयुर्वेद, युनानींचा समावेश आहे. केरळनंतर सर्वाधिक मेडिकल काॅलेज महाराष्ट्रात आहेत. तरीही महाराष्ट्राची अवस्था काय आहे, हे महत्त्वाचे आहे, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा... माझ्यावर दहा मिनिटात गुन्हा पण...

राज्यपालाच्या भाषणाचा मुद्दा

राज्यपालपद महत्त्वाचे असते. आपल्या प्रोटोकाॅलप्रमाणे राज्यपाल व मुख्यमंत्री यापैकी कोणाला प्राधान्य द्यायचे, तर ते राज्यपालांना द्यायचे. राज्यपालांना जे आपमाणित करतो, त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मला समाधानकारक वाटतो. साहित्यात अनेक प्रकार असतात. कथा, कादंबरी, ललित असे अनेक प्रकार असतात. परंतु राज्यपालांचे भाषणात वेदना आणि व्यथाच मला दिसतात. आपली बाजू मांडत असताना किमान काहीतरी आकडेवारी मांडली पाहिजे. परंतु तसे काहीच नाही. आपण चाैकात भाषण करतो, तसे भाषण राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठविले. हे भाषण म्हणजे आपल्या अपयशाचा लेखाजोखा म्हणावा लागेल. 
न्यायालयाने सुद्धा राज्य सरकारला फटकारले आहे, हे गंभीर आहे. पहिल्यांदा माझे कुटुंब, माझी जबाबदारी, म्हणजे सरकारची काहीच जबाबदारी नाही. सर्व जबाबदारी तुमचीच आहे. उरलेली जबाबदारी मोदींची. आमच्या सरकारची काही जबाबदारी आहे की नाही.राज्यपालांचे अभिभाषण कसे असावे, एक वर्षातील दिशा असायला हवी. परंतु या भाषणात काहीच दिसत नाही. यमक जुळविणारी भाषा ही यशाचे गमक असू शकत नाही, हे मला सांगायचे आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख