शासकीय कार्यालयांवर भगवा लावण्यास गुणरत्न सदावर्ते यांचा विरोध - Gunaratna Sadavarte opposes planting saffron on government offices | Politics Marathi News - Sarkarnama

शासकीय कार्यालयांवर भगवा लावण्यास गुणरत्न सदावर्ते यांचा विरोध

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 जून 2021

शिवराज्याभिषेक दिन सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करून कार्यालयात भगवा ध्वज लावण्यासंदर्भात सरकारने स्पष्ट आदेश दिल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या (मुंबई) पत्रकात म्हटले आहे.

मुंबई : शिवस्वराज्य दिनी शासकीय कार्यालयांवर तिरंगा राष्ट्रध्वजाखेरीज अन्य कोणताही ध्वज लावू नये, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी केली आहे. तर यादिवशी शासकीय कार्यालयांमध्ये भगवा ध्वज न लावणाऱ्यांची तक्रार केली जाईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. (Gunaratna Sadavarte opposes planting saffron on government offices)

शिवराज्याभिषेक दिन सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करून कार्यालयात भगवा ध्वज लावण्यासंदर्भात सरकारने स्पष्ट आदेश दिल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या (मुंबई) पत्रकात म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शासकीय नियमांनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो की नाही, याची पहाणी करून या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या कार्यालयांची तक्रार योग्य त्या मार्गाने शासनास करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला असल्याचे मोर्चाच्या पत्रकात म्हटले आहे.

राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांवर भगवा स्वराज्यध्वज तसेच राजदंडाचे प्रतीक म्हणून स्वराज्यगुढी उभारावी असे राज्य शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे. याच परिपत्रकास सदावर्ते यांनी विरोध केला आहे. 

शासकीय कार्यालयावर राष्ट्रध्वज तिरंग्याखेरीज अन्य कोणत्याही धर्मीय ध्वजारोहणाला आपला विरोध असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांचे म्हणणे आहे. आपल्या या भूमिकेस राज्यातील विद्यार्थी, कर्मचारी, सर्वधर्मीय नागरिक यांनी पाठिंबा दिल्याचा सदावर्ते यांचा दावा आहे. तिरंग्याखेरीज अन्य ध्वज शासकीय कार्यालयावर लावण्यासाठी आपण उपस्थित राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. 

उद्या परशुराम सेनेने भगवान श्रीरामाचा ध्वज शासकीय कार्यालयावर ध्वजारोहण करण्याची मुभा मागितली, सम्राट अशोकाच्या वैचारिक वंशजांनी जर त्यांचा ध्वज लावण्याची मुभा मागितली तर देणार का, इस्लामिक राज्य केलेल्या निजामच्या तत्कालीन विचारांना मान्य करणाऱ्यांनी इस्लामिक ध्वजाचे ध्वजारोहण करण्याची परवानगी मागितली तर देणार का ? त्याच प्रकारे पेशव्यांचा राजध्वजाचे ध्वजारोहण करण्याची परवानगी मागितली तर देणार का ? असेही प्रश्न सदावर्ते यांनी उपस्थित केले आहेत.

कोणाही राजाचा ध्वज शासकीय कार्यालयांवर लावणे राज्यघटनेविरुद्ध आहे. तर या विषयावरील मंत्री हसन मुश्रीफ यांचे उत्तर अशोभनीय आहे, असाही दावा सदावर्ते यांनी केला आहे.
 

हेही वाचा...

पोटाला बाॅंब लावू, पण आरक्षण घेऊच

 

हेही वाचा

माझ्या मनात अजितदादांबाबत अनेक प्रश्न

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख