धनगर समाजाचे नेते लहू शेवाळे यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश - Dhangar Samaj leader Lahu Shewale joins Congress with activists | Politics Marathi News - Sarkarnama

धनगर समाजाचे नेते लहू शेवाळे यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

धनगर समाज हा नेहमीच काँग्रेस पक्षाच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. महाराष्ट्र तसेच कर्नाटकातही हा समाज मोठ्या संख्येने आहे. काँग्रेस पक्षही हा समाजाच्या पाठिशी नेहमीच उभा राहिला आहे.

मुंबई : काॅंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकजण इच्छुक असून, आज धनगर समाजाचे नेते जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहू शेवाळे यांनी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

काँग्रेस पक्ष हा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून, संविधानात असलेल्या समतेच्या वाटेवरून मार्गक्रमण करणारा पक्ष आहे. समाजातील पददलितांना न्याय देण्याचा पक्षाचा प्रयत्न राहिला आहे. लहू शेवाळे यांच्या पक्ष प्रवेशाने काँग्रेस पक्षाला आणखी बळ मिळेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

टिळक भवन येथे पार पडलेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सोनल पटेल उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लहू शेवाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

या वेळी बोलताना एच. के. पाटील म्हणाले की, धनगर समाज हा नेहमीच काँग्रेस पक्षाच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. महाराष्ट्र तसेच कर्नाटकातही हा समाज मोठ्या संख्येने आहे. काँग्रेस पक्षही हा समाजाच्या पाठिशी नेहमीच उभा राहिला आहे. काँग्रेसने कर्नाटकात सिद्धरामय्या यांना पाच वर्ष मुख्यमंत्रीही करुन दाखवले. दोन्ही राज्यात धनगर समाजाचे प्राबल्य आहे. लहू शेवाळे यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षाला आणखी बळ मिळेल. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात येणाऱ्यांची संख्या वाढत असून, पक्ष संघटना अधिक बळकट होत आहे, असे पाटील म्हणाले. 
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख