देवेंद्र फडणवीस यांचे गणित कच्चे : नीलम गोऱ्हे - Devendra Fadnavis's Mathematics Raw: Neelam Gorhe | Politics Marathi News - Sarkarnama

देवेंद्र फडणवीस यांचे गणित कच्चे : नीलम गोऱ्हे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 डिसेंबर 2020

युवा नेते आदित्य ठाकरे यांनी कागदपत्रांसह अनेक कार्यक्रमांतून स्पष्ट माहिती दिली आहे. स्थगिती म्हणजे अंतिम निर्णय नसतो. अंतिम निर्णय हा जनतेच्या बाजुनेच होईल.

मुंबई : एखाद्या विषयात अभ्यास कोणाचाच पूर्ण होत नसतो. त्यामुळे अभ्यास करण्याचा सल्ला फडणवीस यांनी दिला असेल, तर त्यांना गणित हवे तसे सोडविता येत नाही. त्यांचे गणित कच्चे आहे, असे म्हणावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास किती आहे, याची जाणीव अनेक कार्यक्रमांमधून होते. शाश्वत विकासावर झालेल्या बैठकांमध्ये मी पाहिलेले आहे, असा टोला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. 

माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, की आदित्य ठाकरे यांच्याविषयी बालहट्ट असे म्हणणे योग्य नाही. त्यांच्यावर अभ्यासाविषयी बोलणं म्हणजे त्यांच्या मनातील दुरावा, किल्मीश समोर येते. आदित्य यांच्याबद्दल टीका केल्याने उलट युवकांच्या मनात आदित्य विषयी उत्सुकता निर्माण होते आहे. त्यामुळे म्हणतात ना `निंदकाचे घर असावे शेजारी.` याप्रमाणे फडणवीस यांनी निंदा केली, तर आदित्यलाच त्याचा फायदा होईल, असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

मिठाचा खडा कोणी टाकला ते माहित आहे

गोऱ्हे म्हणाल्या,  ``त्यांच्या काळी मिठाचा खडा आम्ही टाकला, असं म्हटलं जातं. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच सांगितलंय की मिठाचा खडा कोणी टाकला ते. `मी पुन्हा येईल` असे म्हणणे अहंकार आहे व ते जनतेला ठाऊक आहे.`` अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

अभ्याअंतीच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जागांबाबत निर्णय घेतला आहे. पर्यावरणवादी तसेच वृक्षप्रेमी यांच्या म्हणण्याला सन्मान करणे म्हणजे अहंकार, अशीच काहीतरी विपर्यास व्याख्या केली जात आहे. न्यायालयाच्या सर्वच निर्णयांचा आदर केला जातो. हे सरकार आदर करणारेच आहे. अंतीम निर्णय आलेलाच नाही. परंतु ज्या वेळी ही जागा राज्य सरकारच्या मालकीची नव्हती, असे जर संबंधितांचे म्हणणे आहे, तर आधीच्या संदर्भात का बरं निर्णय दिले होते. संबंधित महसूलमंत्र्यांनी त्या वेळी स्वाक्षऱ्या केल्या होत्या, असे गोऱ्हे यांनी निदर्शनास आणून दिले. 

युवा नेते आदित्य ठाकरे यांनी कागदपत्रांसह अनेक कार्यक्रमांतून स्पष्ट माहिती दिली आहे. स्थगिती म्हणजे अंतिम निर्णय नसतो. अंतिम निर्णय हा जनतेच्या बाजुनेच होईल. न्याय देवता प्रामाणिक प्रयत्नांचा आवाज ऐकतच असते. न्यायालयाचा निर्णय राज्य सरकारच्या बाजुने होईल, अशी खात्री गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

निवडणूक गांभिर्यानेच घेतली पाहिजे

एका प्रश्नाला उत्तर देताना गोऱ्हे म्हणाल्या, की कुठलीही निवडणूक गांभिर्यानेच घेतली पाहिजे. ग्रामपंचायतींच्या योजना, वित्त आयोगाच्या योजना, रोजगार हमी योजना असे शेेकडो निर्णय ठाकरे सरकारने घेतले आहे. या कामांबाबत तसा सरकारचा थेट संबंध नसतो. ग्रामपंचायत ज्या चांगल्या भूमिका घेतात, त्याला महाविकास आघाडीची साथ असते. 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख