कोरोना काळात भ्रष्ट्राचार करणारांची लक्तरे वेशीवर टांगू : फडणवीस

भाजपच्या नवीन कार्यकारिणीच्या कामामुळे, मेहनतीने मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकेल, हा विश्वास आहे.
devendra 1.png
devendra 1.png

मुंबई : कोरोनाच्या काळात अनेकांनी आपलं चांगभलं करून घेतले. प्रेताच्या टाळुवरचं लोणी खाणं यालाच म्हणतात. त्यांना कोरोनाची नव्हे, काॅंट्रॅक्ट कोणाला मिळते, याचीच चिंता होती. कोरोनाच्या काळातील भ्रष्ट्राचाराची पुस्तिका तयार करण्यात येत असून, त्याद्वारे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची लक्तरे वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही,  असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

भाजप कार्यकारिणीची बैठक मुंबई येथे आज सायंकाळी झाली. या वेळी फडणवीस बोलत होते. या वेळी मुंबई भाजपच्या अध्यक्ष मंगलप्रभा लोढा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विजय पुराणीक तसेच अनेक नेते उपस्थित होते.

मुंबईच्या नवीन कार्यकारीणीला शुभेच्छा देत फडणवीस म्हणाले, की या कार्यकारिणीच्या कामामुळे, मेहनतीने मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकेल, हा विश्वास आहे. 

भाजपचे 75 कार्यकर्ते जे कोरोनाच्या काळात मुंबईत सक्रीय होते. जनसेवा करीत होते. जनसेवा करीत असताना ती ग्रासीत होऊन आपल्यातून निघून गेले. त्यांना विनम्र श्रद्धांजली, असे म्हणून त्यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

कोरोनाच्या बाबतीत फडणवीस यांनी महाविकास आघाडीचा समाचार घेतला. ते म्हणाले, की कोरोनाचा प्रचंड कहर महाराष्ट्राने पाहिला. मला आश्चर्य वाटते, की सरकारचे नेते आम्ही कोरोना आटोक्यात आणलाय, असे वक्तव्य करतात, याचे आश्चर्य वाटते. हे खरं आहे की देशात कोरोना आटोक्यात आणला आहे. परंतु महाराष्ट्रात जे लोक स्वतःची पाठ थोपटून घेतात, त्यांना माझा सवाल आहे, की देशात सर्वाधिक कोरोना केसेस महाराष्ट्रात व त्यात मुंबईतच का झाल्या. देशातील 40 टक्के लोक महाराष्ट्रात मृत्युमूखी पडले, हे कोणाचे कर्तत्त्व आहे. आपण एकूण मृत्यूची संख्या पाहिली, तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी मोठी आहे, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी प्रेताच्या टाळुवरचं लोणी खाल्लं

फडणवीस म्हणाले, की जे पाठ थोपटून घेतात, त्यांनी उत्तर दिले पाहिजे. हे लोक मृत्यूमुखी पडले, याला जबाबदार कोण आहे. दुर्दव्य असे आहे, की कोरोनाचे संकट असताना मुंबई व अनेक महानगरांत कोरोनाच्या नावाने अऩेकांनी आपलं चांगभलं करून घेतले. `प्रेताच्या टाळुवरचं लोणी खाणं` हा वाक्प्रचार आणि कोरोनाच्या काळात भ्रष्टाचारात काय फरक आहे. कोरोनाच्या संकटामुळे आम्ही सरकारला साथ दिली. आम्ही बोललो नाही. आम्ही टीका करीत नव्हतो. आता मात्र त्यांची लक्तरे वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी कोरोनाच्या भ्रष्ट्राचाराच्या संदर्भात अमित साटप पुस्तिका तयार करीत आहेत. त्याद्वारे त्यांचा खरा चेहरा समोर येणार आहे. त्यांना कोरोनाची चिंता नव्हती, कोरोनाच्या नावाने कोणाला काॅंट्रॅक्ट मिळाले पाहिजे, याची त्यांना चिंता होती. हे सगळं मुंबईत घडलेले मुंबईकरांपर्य़ंत आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.


Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com