कोरोना काळातील सरकारचा भ्रष्टाचार उघड करणार : फडणवीस - Corona to expose government corruption: Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

कोरोना काळातील सरकारचा भ्रष्टाचार उघड करणार : फडणवीस

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

मुंबईतील आरे कारशेड़ या प्रकरणाची माहिती मुंबईतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवणार आहे. काही अधिकारी आपल्या फायद्यासाठी मुख्यमंत्र्यांचा विरोधाभास करतात. त्यांची दिशाभूल करतात.

मुंबई : कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारला मृत्यू थांबविता आले नाही. देशातील सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात आहेत. या काळात झालेला भ्रष्ट्राचार आम्ही उघड करणार असून, कोरोनाच्या नावाने झालेली लूट आम्ही सहन करणार नाही, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

भाजपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, की मुंबईतील आरे कारशेड़ या प्रकरणाची माहिती मुंबईतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवणार आहे. काही अधिकारी आपल्या फायद्यासाठी मुख्यमंत्र्यांचा विरोधाभास करतात. त्यांची दिशाभूल करतात. आरे कारशेडसाखे निर्णय मुंबईकरांच्या विरोधातील आहेत. याबाबत यातील सत्य आम्ही छोट्याश्या पुस्तिकेच्या माध्यमातून पाठवणार आहोत. मुंबईकरांना मेट्रोपासून कसे दूर ठेवले, हेही दाखविणार आहोत.

फडणवीस म्हणाले, की सरपंचाची निवडणूक स्थगित, शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या स्थगित केल्या. भरत्या बंद केल्या. कोरोनाच्या काळात हे सरकार अपयशी ठरले आहे. ईश्वराची कृपा म्हणून दुसरी लाट ही देशात आणि महाराष्ट्रात विशेष दिसत नाही. येऊ नये अशी इच्छा आहे. पण हे लोक सांगतात की आम्ही महाराष्ट्रात कोरोना थोपविला. देशात 1 लाख 34 हजार मृत्यू झाले. त्यापैकी 46 हजार मृत्यू महाराष्ट्रात आहेत. देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. काय अवस्था आहे महाराष्ट्र व मुंबईची. रस्त्यावर तडफडून माणसे आम्ही पाहिले. तीन-तीन दिवस लोकं मेले, तरी कोणाला पत्ता नाही, असे आम्ही पाहले. शाैचालयात डेडबाॅडी आम्ही पाहल्या. किती व्यथा सांगाव्यात. सरकारचे नियंत्रणच राहले नाही. पुन्हा चाचण्या कमी केल्या. आम्हाला आकड्यांशी लढायचे की कोरोनाशी. मी याबाबत वारंवार बोललो. सगळी माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठविली. माझ्या पत्राला त्यांनी उत्तर दिले नाही, परंतु त्याबाबत कार्यवाही झाली असती, तर मृत्यू थांबविता आले असते. या काळात प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार झाला, तो आम्ही उघड करणार आहोत. कोरोनाच्या नावाने झालेली लूट आम्ही उघड करू, असा इशाऱा फडणवीस यांनी दिला.

कापूस, सोयाबीन उत्पादकांना मदत मिळावी 

शेतकऱ्यांची व्यथा मांडताना फडणवीस म्हणाले, की राज्यात गेल्या वर्षभरात  शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आले. विदर्भात पूर आला. कोकणात निसर्गचक्रीवादळ आले. मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. महाराष्ट्रातील शेतकरी उद्वस्थ झाला. वचनपूर्ती काय सांगता, शेतकऱ्यांना दिलेले वचन विसरले. आजही तुम्ही जाहीर केलेली मदत देखील शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मी अर्ध्या महाराष्ट्राचा दाैरा करून आलो. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने फिरलो. मी सर्व ठिकाणी एकच प्रश्न विचारला की मदत मिळाली का. परंतु कोठेच मदत मिळाली नाही. बोंडअळीमुळे कापूस गेला. खोडकिडीमुळे सोयाबून गेला, याचा तर पंचनामा सुद्धा नाही. आमची मागणी आहे, की कापसाचा, सायाबीनचा शेतकरी रस्त्यावर आहे, त्याला मदत मिळाली पाहिजे.

मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की पिकेल ते विकेल. पिकलेच नाही, परंतु जे पिकलं, तेही विकण्याची व्यवस्था नाही. जे कोरोनाच्या काळात छोटे घटक, बारा बलुतेदार, टॅक्सीवाले, दुकानदार या कोणासाठीही कोणतेही पॅकेज सरकारने दिले नाही. कोरोनाच्या काळात कुठलीही मदत मिळाली नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला.

 मराठा आरक्षणात त्यांनी घोळ घातला

मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, की सरकारने मोठा घोळ घातला आहे. केवळ दोन आरक्षणे उच्च न्यायालयात टिकली. उच्च न्यायालयात आरक्षण स्थगित झाली. तमिळनाडू व महाराष्ट्रातील आरक्षण टिकले. परंतु ते घटनापिठाकडे पाठविताना त्याला स्थगिती देण्यात आली. पहिल्याच दिवशी त्यांचे वकील सांगतात, आमच्याकडे अद्याप माहिती आली नाही. काय अभ्यास आहे या लोकांचा. स्थगिती काढण्यासाठी माहिती असूनही घटनापिठाच्या संदर्भात कुठलेही सरकार गंभीर नाही. केवळ वेळकाढू धोरण आहे. आम्ही ज्या वेळी मराठा आरक्षणाचा कायदा केला, त्या वेळी ओबीसी आरक्षणाला कायदेशीर संरक्षण दिले. अशा परिस्थितीत सत्ता पक्षातीलच काही नेते दोन्ही बाजुंनी जाणिवपूर्वक वक्तव्य करून दोन्ही समाजात घबराहट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

 

Edited By - Murlidhar Karale 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख