भाजप सरकारच्या हुकूमशाहीसमोर काँग्रेस झुकणार नाही : बाळासाहेब थोरात - Congress will not bow to BJP government's dictatorship: Balasaheb Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप सरकारच्या हुकूमशाहीसमोर काँग्रेस झुकणार नाही : बाळासाहेब थोरात

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

या शेतकऱ्यांच्या पाठिशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असून, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करत काँग्रेस पक्षाने या काळ्या कायद्याविरोधात आंदोलने केली आहेत.

मुंबई : केंद्र सरकारने काळे कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आज शेतकऱ्यांच्या दोन कोटी सह्यांचे निवेदन देण्यासाठी काँग्रेस शिष्टमंडळ जात असताना काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधीजी यांच्यासह काँग्रेस खासदार, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व इतर नेत्यांना पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले.

या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करून मोदी सरकारच्या हुकुमशाहीवृत्ती व दडपशाहीसमोर आम्ही झुकणार नाही. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी व लोकशाही वाचविण्यासाठी संघर्ष करत राहू, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, सरकारने पोलीस बळाचा वापर करून केलेली कारवाई लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. केंद्रातील भाजपा सरकारला विरोधकांनी प्रश्न विचारलेले चालत नाहीत. या मंडळींचा लोकशाही, संविधानावर विश्वास नाही फक्त सरकार विरोधातील प्रत्येक आवाज बंद करण्यासाठी दडपशाहीचा, दहशतीचा मार्ग  आणि पोलिसी बळ अवलंबायचे हीच भाजपा सरकारची निती राहिली आहे.

सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना बदनाम करायचे, हा त्यांचा नेहमीचा डाव राहिला आहे. शेतकरी आंदोलकांनाही खलिस्तानी, देशद्रोही ठरवून त्यांना बदनाम करण्याचे काम भाजपाने केले आहे. परंतु शेतकऱ्यांचा निर्धार ठाम असून, हे काळे कायदे रद्द होईपर्यंत या संघर्षात काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभा आहे.

केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे हे पाशवी बहुमताच्या जोरावर कोणाशीही चर्चा न करता मंजूर करून घेतले. या काळ्या कायद्याविरोधात देशभरातील शेतकरी एकवटले असून, दिल्लीच्या रस्त्यावर कडाक्याच्या थंडीत एक महिन्यापासून शेतकरी ठाण मांडून बसलेले आहेत. परंतु केंद्रातील भाजपाचे अडेलतट्टू सरकार मात्र शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार नाही.

या शेतकऱ्यांच्या पाठिशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असून, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करत काँग्रेस पक्षाने या काळ्या कायद्याविरोधात आंदोलने केली आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून आज राष्ट्रपतींना शेतकऱ्यांच्या दोन कोटी सह्यांचे निवेदन सादर करण्यास जात होते. शेतकऱ्यांच्या सह्यांच्या मोहिमेत महाराष्ट्रातून ६० लाख सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

राष्ट्रपती भवनावर काढलेल्या मार्चमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी यांच्यासह महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील हेही उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि देशातील लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेस भाजपा सरकारविरोधात संघर्ष करत राहू, असे थोरात म्हणाले.
 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख