मुख्यमंत्र्यांची `ती` मुलाखत उत्तर देण्याच्या लायकीचीच नव्हती - The Chief Minister's interview was not worth answering | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांची `ती` मुलाखत उत्तर देण्याच्या लायकीचीच नव्हती

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी पाहिले नाही. असे कधी होत नाही. मुख्यमंत्री संयमी आहेत, असे मी ऐकले होते,  व पाच वर्षात अनुभवले होते. परंतु कालची मुलाखत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला शोभणारी नाही.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षपूर्ती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केवळ धमक्यांची भाषा वापरली. ती मुलाखत मुख्यमंत्री या पदाला शोभली नाही. ती मुलाखत त्या लायकीचीच नव्हती, त्यामुळे तिला उत्तर देणे आम्हाला योग्य वाटले नाही, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.

भाजपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, की महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले. या एका वर्षात या सरकारने काहीच विकास केला नाही. खऱं तर मुख्यमंत्र्यांनी एका दैनिकाला मुलाखत दिली. अपेक्षा अशी होती, की या मुलाखतीत एका वर्षात आम्ही काय केले, पुढची दिशा, कसा विकास करणार, महाराष्ट्रातील दीन-दलित, शेतकरी, कामगार, शहरे, ग्रामीण भाग याबाबत आमचे व्हिजन काय आहे, महाराष्ट्र कुठे न्यायचा, याबाबत मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीत काही दिशा द्यायला हवी होती. परंतु दुर्दवाने या मुलाखतीत केवळ टीका टीपन्नी झाली.

नाक्यावर भांडणाप्रमाणे ते भांडतात

फडणवीस म्हणाले, की महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री मी पाहिले नाही. असे कधी होत नाही. मुख्यमंत्री संयमी आहेत, असे मी ऐकले होते,  व पाच वर्षात अनुभवले होते. परंतु कालची मुलाखत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला शोभणारी नाही. तुम्ही संविधानाची शपथ घेतली आहे. कोणाच्याही विरुद्ध राग किंवा द्वेच्या शिवाय कारवाई करणार नाही, हा शपथेचा भाग आहे. त्याचे अनुकरण करताना मुख्यमंत्री दिसत नाही. कालच्या मुलाखतीत कोणाच्या हात धुवून लागू, कोणाचा खिमा बनवू, हे कुठले शब्द वापरले. अशा प्रकारचे भांडण हे न्याक्यावर होते. मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अशा प्रकारे चिरडण्याची भाषा ज्यांनी केली, ते फार काळ टिकले नाहीत. या देशात लोकशाही आहे. हे बरं झालं की त्यांची मुलाखत एक दिवस आधी झाली. न्यायालयाच्या निर्णयानंतर ही मुलाखत झाली असती, तर ती वेगळीच झाली असती.

मला असे वाटते, मी ही मुलाखत कुठल्याही मुख्यमंत्र्यांची मानत नाही. त्यावर उत्तर देणे किंवा टीपन्नी देणे योग्य नाही. ती त्या लायकीचीच नाही. ते म्हणतात पाच वर्ष राज्य .चालविणार, जरूर चालवा. पण नुसत्या धमक्या देऊ नका. एका वर्षात गव्हर्नंस कुठेही पाहायला मळाला नाही. हे सरकारच मुळात विश्वासघातातून आले आहे. जनतेचा विश्वास घात करून हे सरकार आले आहे. एका पक्षासोबत युती करून मते मागता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने मते मागता. त्यांचा चेहरा वापरून मते मिळविता आणि नंतर विरोधकांशी हातमिळवणी करतात, म्हणून हा विश्वासघात आहे. सरकार झाल्यानंतरही उपलब्धी काय तर केवळ स्थगिती. वेगवेगळ्या विकास कामांना स्थगिती देणे याच्या व्यतिरिक्त दाखविण्यासारखे या सरकारकडे काहीच नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख