कंगनाच्या वकिलाची फी स्वतः देऊन मुख्यमंत्र्यांनी प्रायश्चित्त करावे - The Chief Minister should atone by paying Kangana's lawyer's fee himself | Politics Marathi News - Sarkarnama

कंगनाच्या वकिलाची फी स्वतः देऊन मुख्यमंत्र्यांनी प्रायश्चित्त करावे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

अर्णब गोस्वामी संदर्भातील निर्णयानंतर आज पुन्हा सरकारचे थोबाड फुटले आहे. आजचा निकाल हा सरकारच्या सूडाच्या कारभारावर झगझगीत प्रकाशझोत टाकणारा आहे.

मुंबई : कंगना राणावत संदर्भातील आजच्या हायकोर्टाच्या निर्णयाने सूडाच्या राजकारणाची भाषा करणाऱ्या सरकारचे पुन्हा एकदा थोबाड फुटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याचे प्रायश्चित्त घेऊन कंगना राणावतला द्यावयाची नुकसानभरपाई आणि वकिलांची फी स्वतःच्या खिशातून भरावी, अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

अर्णब गोस्वामी संदर्भातील निर्णयानंतर आज पुन्हा सरकारचे थोबाड फुटले आहे. आजचा निकाल हा सरकारच्या सूडाच्या कारभारावर झगझगीत प्रकाशझोत टाकणारा आहे. कंगना राणावतचे घर पडण्याच्या कारवाईमागचा बोलवता धनी म्हणजे सूडाच्या राजकारणाची भाषा करणारे मुख्यमंत्रीच आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याचे प्रायश्चित्त घेतले पाहिजे आणि कंगनाच्या न्यायालयीन प्रकरणात आतापर्यंत वकिलांवर झालेला खर्च जो जनतेच्या पैशातून करण्यात आला, त्याची भरपाई आता उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या खिशातून करावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करून ही मागणी केली आहे.

'उखाड दिया' म्हणणाऱ्यांनाच उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाद्वारे 'उखाड दिया हैं' अशी टीका भातखळकर यांनी केली.

आपला अहंकार जपण्यासाठीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई घडवून आणली होती. सरकारच्या विरोधात टीका करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, मारहाण करणे, जेल मध्ये टाकणे व या ना त्या मार्गाने लोकांचा आवाज दडपण्याचेच काम हे ठाकरे सरकार करत असून ठाकरे सरकारकडून राज्यात छुपी आणीबाणी लागू केली  गेली असल्याचा आरोपही भातखळकर यांनी केला आहे.
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख