भंडारा पोलीस वाहनाचा वर्धा येथे अपघात, एक आरोपी ठार, तीन पोलीस कर्मचारी जखमी - Bhandara police vehicle crashes at Wardha, one accused killed, three police personnel injured | Politics Marathi News - Sarkarnama

भंडारा पोलीस वाहनाचा वर्धा येथे अपघात, एक आरोपी ठार, तीन पोलीस कर्मचारी जखमी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 एप्रिल 2021

भंडारा कारागृहात बंदिवान असलेल्या अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या 358 कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणातील आरोपीचा पोलिस वाहनाच्या अपघातात मृत्यू झाला आहे.

पुणे ः भंडारा कारागृहात बंदिवान असलेल्या अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या 358 कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणातील आरोपीचा पोलिस वाहनाच्या अपघातात मृत्यू झाला आहे.

मुंबई येथील न्यायालयातील सुनावणी आटोपून परत भंडाऱ्याकडे जात असलेल्या पोलीस वाहनाचा वर्धा जिल्ह्याच्या राष्ट्रीय महामार्गावरील राजनी फाट्याजवळ अचानक टायर फुटल्याने अपघात झाला.

वाहनाने तीन पलट्या खाल्ल्या. या अपघातात आरोपीचा मृत्यू झाला असून, भंडारा मुख्यालयातील तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास झाला. आरोपी श्रावण बावणे (वय 65)  असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलीस कर्मचारी सावंत जाधव (वय 42) शकील शेख, अभिषेक घोडमारे हे गंभीर जखमी झाले आहेत.

भंडारा येथील कारागृहात असलेला कैदी श्रावण बावणे याची मुंबई येथील न्यायालयात तारीख असल्याने भंडारा येथील तीन पोलीस कर्मचारी आरोपी श्रावणला घेऊन एम.एच. 36 2273 क्रमांकाच्या पोलीस वाहनाने मुंबई येथे घेऊन गेले होते. शनिवारी आरोपीची न्यायालयात सुनावणी आटोपल्यानंतर आरोपीला परत भंडारा कारागृहात नेण्यासाठी परत जात असताना राजनी फाट्याजवळ पोलीस वाहनाचा टायर फुटला. वाहन वेगात असल्याने पोलीस वाहनाने रस्त्यावरच तीन पलट्या खात रस्तेच्या कडेला पलटी झाले. यात आरोपी श्रावण बावणे याचा जागीच मृत्यू झाला, तर, तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले.

तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

श्रावण बावणे याच्यावर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या 358 कोटी रूपयांच्या घोटाळ्यासह विविध भ्रष्टाचाराचे गंभीर गुन्हे दाखल असून, त्या गुन्ह्यातील आरोपाखाली तो कारागृहात बंदिस्त होता.

अपघातात तो ठार झाल्याची माहिती मिळताच आर्वी पोलिसांसह वर्धा येथील मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपघातस्थळ गाठत तपास सुरु केला आहे. आता आरोपीच्या अपघाती मृत्युनंतर भंडारा पोलिसांद्वारे याची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख