राजकारणापलिकडे देवेंद्र फडणवीस हे संजय राऊत यांचे मित्र - Beyond politics, Devendra Fadnavis is Sanjay Raut's friend | Politics Marathi News - Sarkarnama

राजकारणापलिकडे देवेंद्र फडणवीस हे संजय राऊत यांचे मित्र

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पाच वर्षे काम केले. ते मुख्यमंत्री होते. ते भाजपचा तरुण चेहरा आणि प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. आम्हाला भविष्यात देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय स्तरावर मोठे झालेले पाहायचे आहे.

मुंबई : एका मुलाखतीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे काैतुक केले आहे. राजकारणात विरोधाला विरोध होत असतो, मात्र त्यापलीकडे पाहिल्यास देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

एका माध्यमाने घेतलेल्या मुलाखतीत राऊत यांनी फडणवीस यांच्याबाबत विरोधी नव्हे, तर काैतुकाचे उद्गार काढले आहेत. राऊत म्हणतात, ``देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एका आहेत. राजकारणातील एक तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय स्तरावर काम करताना आणि मोठं झालेलं पाहायचंय.``

हीच आहे महाराष्ट्राची परंपरा

राजकारणात कोणीही कोणाचाही मित्र किंवा शत्रु नसतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. आमच्यात केवळ वैचारिक मतभेद आहेत. राजकीय विरोधकांमध्ये चांगले संबंध असणे ही महाराष्ट्राची आजपर्यंतची परंपरा आहे. एकेकाळी शरद पवार हे आमच्याविरोधात होते. तरीही मी त्यांना भेटायचो. यावर अनेकजण आक्षेपही घ्यायचे. मात्र, इतकी वर्षे राजकारणात असणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर काम करणाऱ्या नेत्याला भेटणे गरजेचे आहे. त्यांचे म्हणणे समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे वेळ मिळाल्यावर मी सगळ्याच राजकीय नेत्यांना भेटत असतो, असे संजय राऊत यांनी सांगितले.

फडणवीस प्रमुख नेत्यांपैकी एक

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पाच वर्षे काम केले. ते मुख्यमंत्री होते. ते भाजपचा तरुण चेहरा आणि प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. आम्हाला भविष्यात देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय स्तरावर मोठे झालेले पाहायचे आहे. आम्ही आमचे राजकारण करत राहणार, ते त्यांचे राजकारण पुढे नेतील. या सगळ्यातून एकमेकांना विरोध होणे क्रमप्राप्त आहे, पण म्हणून लगेच तलवार काढायची नसते. राजकारणातील भांडणे तात्पुरते असतात. नंतर विरोधकांनाही एकमेकांसोबत काम करावे लागते, हे अनेक गोष्टींवरून दिसून आले आहे. त्यामुळे ते विरोधात असले, म्हणून ते दुष्मण नाहीत, असे गाैरवोद्गार राऊत यांनी काढले. 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख