चिपळूणमध्ये पालकमंत्र्यांच्या बैठकीसाठी कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारला - Activists denied access to Guardian Minister's meeting in Chiplun | Politics Marathi News - Sarkarnama

चिपळूणमध्ये पालकमंत्र्यांच्या बैठकीसाठी कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारला

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 12 जानेवारी 2021

पालकमंत्री अनिल परब यांचा चिपळूण दौरा शासकीय कार्यालयातून जाहीर करण्यात आला. दिर्घकालावधीनंतर पालकमंत्र्यांचे दर्शन होणार म्हणून कार्यकर्ते आनंदी झाले होते.

चिपळूण : पालकमंत्री अनिल परब यांनी वालोपे येथील खासगी हॉटेलमध्ये पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला भाजपसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी कडवे आव्हान उभे केले आहे. या पार्श्‍वभूमीवर मोजक्या पदाधिकार्‍यांची बैठक घेवून पालकमंत्र्यांनी त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी कानमंत्र दिला. मात्र बैठक सुरू होण्यापूर्वी कार्यकर्त्यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसत होती. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांंवर पदाधिकार्‍यांचा विश्‍वास नाही का, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सभागृहातून बाहेर पडताना सुरू होती. 

पालकमंत्री अनिल परब यांचा चिपळूण दौरा शासकीय कार्यालयातून जाहीर करण्यात आला. दिर्घकालावधीनंतर पालकमंत्र्यांचे दर्शन होणार म्हणून कार्यकर्ते आनंदी झाले होते. वालोपे (ता. चिपळूण) येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा दुपारी साडेतीन नंतर राखीव वेळ होता. 

आमदार भास्कर जाधव, योगेश कदम यांच्यासह जिल्हाप्रमुख सचिन कदम, अण्णा कदम, शशिकांत चव्हाण व चिपळूणसह खेड, दापोली, मंडणगड आणि गुहागर तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी हॉटेलवर पोहचले. पेेढे - परशुराम गावातील ग्रामस्थ मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील भूसंपादनाचा विषय घेवून पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते. ग्रामपंचायतीची निवडणूक असलेल्या काही गावांमध्ये शिवसेनेतच अंतर्गत बंडखोरी आहे. पालकमंत्री त्यावर काहीतरी उपायोजना करतील या अपेक्षेने काहीजण हॉटेलवर आले होते. परंतू शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना भाजपसह महाविकास आघाडीतील काँगे्रस, राष्ट्रवादीने मोठे आव्हान उभे केले होते. मतदानासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. पालकमंत्री जो कानमंत्र देतील तो सभागृहाच्या बाहेर जाता कामानये यासाठी बैठकीच्या सुरवातीलाच कार्यकर्त्यांना बाहेर जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि सेनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांची गोपनीय बैठक पालकमंत्र्यांबरोबर झाली. बैठकीचा तपशील सभागृहाच्या बाहेर जाता कामा नये, याची पुरेपूर काळजी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी घेतली. बंद सभागृहात पालकमंत्र्यांनी ठरविक पदाधिकार्‍यांना कानमंत्र दिला. त्याचे समाधान शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना झाले. 

पेढे - परशुराम गावातील ग्रामस्थांचा प्रश्‍न 

मी पेढे - परशुराम मधील ग्रामस्थांना घेवून पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. बैठक संपल्याचे लक्षात आल्यानंतर जबरदस्तीने सभागृहात प्रवेश केला. पालकमंत्र्यांना पेढे - परशुराम गावातील ग्रामस्थांचा प्रश्‍न समजून सांगितला. ते म्हणाले, मला आता खूप उशिर झाला आहे. 27 जानेवारीला सर्व संबंधितांची रत्नागिरीला बैठक घेवून तुमच्या विषयावर विस्तृतपणे चर्चा करू. आमचा पालकमंत्र्यांवर पूर्ण विश्‍वास आहे. त्यांना भेटला आले हेच आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. 

- विश्‍वास सुर्वे, माजी जिल्हा परिषद सदस्य, पेढे
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख