ऊसतोड कामगारांच्या न्यायासाठी शरद पवारांचे मार्गदर्शन घ्या : पंकजा मुंडे - Take the guidance of Sharad Pawar for justice of sugarcane workers Says BJP Leader Pankaja Munde | Politics Marathi News - Sarkarnama

ऊसतोड कामगारांच्या न्यायासाठी शरद पवारांचे मार्गदर्शन घ्या : पंकजा मुंडे

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

मी मंत्री असतानाही कामगारांच्या बाजूने होते आणि आजन्म राहिन. गोपीनाथ मुंडेंनीही कारखाना चालवताना देखील कामगारांना केंद्रबिंदू मानलं होते. आज कारखाना प्रचंड अडचणीत आहे, मी खूप तारेवरची कसरत करत आहे, पण ऊसतोड कामगार अडचणीत येऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

सातारा : राज्यातील ऊसतोड कामगारांना न्याय देण्यासाठी असलेल्या लवादाबाबत अत्यंत अनुभवी असलेले खासदार शरद पवार यांचे मार्गदर्शन सरकारने घ्यावे. ऊस तोडणी मजूरांचा संप हा हक्कासाठी आहे, कोणाचीही राजकिय पोळी भाजण्यासाठी नाही, असा सल्ला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारला दिला आहे. 

 ऊस तोड मजूरांच्या प्रश्नावर सध्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आक्रमक झालेल्या आहेत. ऊसतोड मजूरांना सन्मानजनक वाढ द्यावी, अन्यथा कोयता चालणार नाही. मजूरांनी आपला कोयता म्यान ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

ऊसतोड मजूरांच्या विविध मागण्यांवर त्या म्हणतात की, ऊस तोडणीचा करार तीन वर्षाचाच होईल. तसेच कोविडच्या धर्तीवर मजूरांना विमा कवच मिळणे आवश्यक आहे. त्याची जबाबदारी सरकारने व  सर्व साखर कारखान्यांनी घ्यावी. सरकार पातळीवर याविषयी चर्चा करण्यासाठी एक तसेच भाववाढ व कोविड १९ सुरक्षा यावर चर्चा करण्यासाठी दुसरी अशा दोन कमिटी साखर संघाने स्थापन कराव्यात.

साखर संघाचे अध्यक्ष श्री. दांडेगावकर हे या कमिमटींचे अध्यक्ष असावेत. या दोन्ही कमिटींनी त्यांचे म्हणणे लवादा समोर मांडावे व चर्चा करावी. ऊसतोड कामगार महामंडळाकडे असणारे विषय हाताळण्यासाठी धनंजय मुंडे यांनाही ही बैठकीला बोलवावे व त्यांचीही जबाबदारी निश्चित करावी. सरकार पातळीवर आरोग्य मंत्री, कामगार मंत्री, महिला बाल कल्याण मंत्री यांनाही बोलवण्यात यावे.

त्यानंतरच कमिटीच्या सूचना लवादासमोर आणाव्यात. त्यावरच लवादाने निर्णय घ्यावा, अशी सूचना आपण साखरसंघाच्या बैठकीत केल्याचे पंकजा मुंडे सांगितले आहे. तसेच लवादाबाबत अत्यंत अनुभवी असलेले खासदार शरद पवार यांचे मार्गदर्शन घ्यावे. संप हा मजुरांच्या हक्कासाठी आहे, कोणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही. माझे ऊसतोड कामगार हे राजकीय प्यादे नाहीत, हे लक्षात घ्यावे, असेही त्यांनी सूचित केले आहे.

 पंकजा ताईंनी कारखानदार किंवा कामगार एक भूमिका घ्यावी असं कोणीतरी म्हणत आहे, यावर त्या म्हणाल्या, मी मंत्री असतानाही कामगारांच्या बाजूने होते आणि आजन्म राहिन. गोपीनाथ मुंडेंनीही कारखाना चालवताना देखील कामगारांना केंद्रबिंदू मानलं होते. आज कारखाना प्रचंड अडचणीत आहे, मी खूप तारेवरची कसरत करत आहे, पण ऊसतोड कामगार अडचणीत येऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख